सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका सुरु आहेत. अजून जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, त्याआधी मोठ्या प्रमाणात पक्षांतराच्या बातम्या येत आहेत. महायुती असो वा महाविकास आघाडी. दोन्ही आघाड्यांमधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते परस्परविरोधी आघाडीत किंवा मित्र पक्षांमध्येच प्रवेश करत आहेत. महायुतीत यावरुन मोठा राडा सुद्धा झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला. मुख्यमंत्र्यांना भेटून आपली नाराजी कळवली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून परस्परांचे नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचं नाही असं ठरलं.
मात्र, तरीही कल्याण-डोंबिवलीत पक्षांतर थांबलेलं नाही. सर्वच पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण राज्यातच नव्हे तर केंद्रातही भाजपचं सरकार आहे. भाजप आजच्या तारखेला एक नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे बहुतांश लोकांचा कल भाजपकडे आहे. पण आता कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
सुरेश भोईर काय म्हणाले?
भाजपचे स्थानिक नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी देत असल्याने सुरेश भोईर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. थोड्याच वेळात मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत.
शेकडे कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना
टिटवाळा परिसरातील जनसंपर्कासाठी ओळख असलेले सुरेश भोईर आता ठाकरे गटात सक्रिय होणार आहेत. कल्याणवरून शेकडे कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेतील नाराजांची पहिली चॉइस परस्परांचे पक्ष आहेत. पण आता वरुनच ठरलय की, परस्परांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील नाराजांची पावलं ठाकरे गटाकडे वळू शकतात.