अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या बेधडक मतांसाठी ओळखले जातात. विविध विषयांवर ते मोकळेपणे व्यक्त होतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटावर टीका केली. यावेळी ते बाजीराव पेशवे यांच्याबद्दलही व्यक्त झाले. त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली, त्याचप्रमाणे ‘बाजीराव मस्तानी’ हा त्यांच्या आयुष्यावरील चित्रपट पाहून मी अस्वस्थ झालो, असंही ते म्हणाले. चित्रपटात तुम्ही फक्त बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांची लव्ह-स्टोरीच दाखवल बसलात, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
‘बाजीराव मस्तानी’बद्दल काय म्हणाले शरद पोंक्षे?“इतिहासाचं प्रचंड वाचन केलं तेव्हा मला बाजीराव पेशवे दिसले.. म्हटलं यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. मी ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट पाहून अस्वस्थ झालो होते. म्हटलं हे काय आहे? बाजीरावच्या आयुष्यामध्ये काही महिने आलेली त्याची बायको .. ती एका पारड्यात आणि 41 लढाया न हरलेला अजेय योद्धा एका पारड्यात.. तर तुम्ही चित्रपट 41 लढायांवर दाखवला पाहिजे ना. फक्त 16-17 महिने म्हणून जी बायको आहे.. तिचीच लव्हस्टोरी तुम्ही दाखवत बसता. चित्रपटात ती दाखवा पण तीन तासांच्या चित्रपटात 15 मिनिटं लव्हस्टोरी दाखवा. कारण त्यांच्या आयुष्यात तेवढीच आहे ती”, असं ते म्हणाले. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. यामध्ये अभिनेता रणवीर सिंहने बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री दीपिका पादुकोण मस्तानीच्या भूमिकेत होती.
पेशव्यांबद्दल काय म्हणाले?“20 वर्षांची त्यांची कारकीर्द आणि 41 व्या वर्षी ते गेले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते पेशवे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर पाऊल टाकत ते पुढे गेले. त्यांनी पण अठरा पगड जातीची लोकं एकत्र केली. त्यांनी स्वराज्याचं साम्राज्य करण्याचा प्रयत्न केला. तीन चतुर्थांश हिंदुस्तानावर त्यांनी भगवा ध्वज फडकावला. हे माहितीच नाही. केवळ ब्राह्मणद्वेषातून पेशवे हे नालायक होते असं सांगून बाजीराव पेशव्यांचं सगळं गायबच झालं. तो इतिहास समजायला नको का?” असा सवाल त्यांनी केला.