मोहोळ तालुक्यात भाजपला अनगर नगरपरिषदेच्या बिनविरोध निवडीतून मोठा राजकीय आधार मिळाला असतानाच, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मात्र जुन्या वैराची धग पुन्हा भडकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते उमेश पाटील यांनी थेट २००५ मधील शिवसेना नेते पंडित कमलाकर देशमुख यांच्या हत्याकांडात तत्कालीन आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांना ‘सूत्रधार’ ठरवत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे मोहोळ-सोलापूरच्या राजकीय वर्तुळात तणाव, संशय आणि संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे. आता नेमके पंडित देशमुख कोण होते आणि त्यांची हत्या कशी घडली होती, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
शिवसेनेचे मोहोळ तालुका उपप्रमुख पंडित कमलाकर देशमुख (वय ४२, रा. देशमुख चाळ, मोहोळ) यांचा राजकीय वैमनस्यातून निर्घृण खून झाला होता. ही घटना ५ एप्रिल २००५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मोहोळ-नरखेड रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी तत्कालीन आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील, मोहोळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अण्णासाहेब बंडगर यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांना तात्काळ अटक झाली नाही, तोपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारातून हलवणार नाही, अशी ठाम भूमिका देशमुख समर्थकांनी घेतल्याने मध्यरात्री उलटून गेली तरी मृतदेह तसाच तिथे पडून होता.
Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण? खरा वादाचा मुद्दाया हत्येने संतापलेल्या शिवसैनिकांनी आणि समर्थकांनी मोहोळ बाजारपेठेतील सुमारे २५ ते ३० दुकाने आणि काही सरकारी वाहने पेटवून दिली होती. त्यात मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यालयही होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक, अनगरवासी आणि अनगरमधून मोहोळमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने जमावाने निवडकपणे लक्ष्य करून जाळली होती. आग वेळीच आटोक्यात आणली न गेल्याने ती आजूबाजूच्या इतर दुकानांनाही पसरली. पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आणि काही दुकानांवर प्रचंड दगडफेक झाली.
‘आर. पी. ग्रुपची शाखा मोहोळमध्ये का उघडली?’ हाच खरा वादाचा मुद्दा होता. याच कारणावरून हा खून झाल्याचा आरोप तक्रारीत नमूद होता. विक्रांत पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बंडगर यांच्यासह राजकुमार भगिरथ गुंड, मधू माळी, पोपट उरणे आणि अन्य दोघे असे सात संशयित होते. तक्रारदार संजय देशमुख (मृत पंडित यांचे बंधू) यांनी हत्येचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचा दावा केला होता. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तपास करून संशयितांवर कठोर कारवाई करू, असे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार चौबे यांनी ‘सकाळ’ला सांगितले होते. या संपूर्ण प्रकारामुळे मोहोळ शहर आणि तालुक्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमका घटनाक्रम काय होता?५ एप्रिल २००५ च्या मध्यरात्रीनंतर आर. पी. ग्रुपच्या स्थापनेशी संबंधित संदीप वायचळ आणि विश्वेश्वर विटेकरी या दोघांना बेदम मारहाण झाली होती. त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे मृत पंडित देशमुख यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर सायंकाळी साडेचार-पावणेपाचच्या सुमारास ते घरी परतत जात असताना पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरून संशयित आरोपींनी त्यांना जबरदस्तीने उचलले आणि एका जीपमध्ये टाकले. जीप भरधाव वेगाने नरखेड रस्त्याने निघाली. जीपमधील लोकांनी लोखंडी गज, चेन, काठ्या यांच्या मदतीने पंडित देशमुख यांना बेदम मारहाण केली. मारहाणीच्या तीव्रतेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नरखेडच्या पलीकडे मलिकपेठजवळील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग ओलांडल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आला. मागून येणारे पंडित यांचे बंधू संजय पद्माकर देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते हे दृश्य पाहून थबकले. त्यांनी मृतदेह गाडीत टाकला आणि सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थेट मोहोळ पोलीस ठाण्यात आणून पोलीस निरीक्षक बंडगर यांच्या कक्षात ठेवला.
हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरलीहत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच चार-पाच हजार लोकांचा प्रचंड जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात गोळा झाला. हत्येच्या सर्व दोषींना तात्काळ अटक करा, अशी एकमुखी मागणी सुरू झाली. संतापलेला जमाव बाजारपेठेत धावला आणि आमदार राजन पाटील यांचे समर्थक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अनगरमधले मोहोळमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांची दुकाने शोधून शोधून जाळू लागला.
आग विझवण्यासाठी सोलापूरहूनअग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या, पण लागलेल्या दुकानांची संख्या इतकी प्रचंड होती की प्रथम फेऱ्यातील पाणी संपल्यानंतर गाड्या परत जाऊन पाणी भरून आणेपर्यंत आग आणखी पसरली.
पोलीस ठाण्याच्या आवारात तहसील कार्यालय, बांधकाम विभागाचे कार्यालयही आहे. चिडलेल्या जमावाने बांधकाम विभागाची आणि आरोग्य खात्याची जीप पेटवून दिली, तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केली. पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयावर प्रचंड दगडफेक करून काचा फोडल्या, कार्यालयातील फर्निचरची मोडतोड केली. विशेष म्हणजे त्यावेळी पोलीस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळच नव्हते.
मोहोळची संपूर्ण बाजारपेठ ठप्पसुरुवातीला पंडित यांचा मृतदेह निरीक्षक बंडगर यांच्या खोलीत ठेवला होता. नंतर तो हलवून पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. ‘‘आरोपींची अटक होईपर्यंत मृतदेह हलवणार नाही,’’ अशी ठाम भूमिका देशमुख बंधू आणि समर्थकांनी घेतली होती. मध्यरात्री उलटून गेली तरी मृतदेह तसाच तिथे होता. मृतदेह हलवल्यानंतर निरीक्षकांच्या खोलीतून रक्ताच्या डाग पुसण्यात आले आणि खोली पाण्याने धुवून काढण्यात आली.
पंडित देशमुख यांच्या खुनानंतर झालेल्या दंगलीमुळे मोहोळची संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली. मोहोळ एस. टी. बस स्थानकाजवळील लहान-मोठी दुकाने, अनगरकरांची दुकाने जाळली किंवा फोडली गेली. (कै.) बाबूराव पाटील-अनगरकर यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज आणि फलक शहरात ठिकठिकाणी फाडण्यात आले. बस स्थानक चौकात गोंधळ सुरू असल्याने सोलापूर, पुणे आणि पंढरपूरकडे जाणारी-येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली. राष्ट्रीय महामार्ग अगदी सुनसान झाला होता. लोणीकडे टोल नाक्यावरही दगडफेक झाली. रात्री साडेअकरानंतर वाहतूक हळूहळू सुरू झाली. खून आणि नंतरच्या दंगलीची बातमी सर्वत्र पसरल्याने संपूर्ण मोहोळ तालुक्यात शुकशुकाट पसरला. राष्ट्रीय महामार्गालगतची सर्व दुकाने नेहमीपेक्षा खूप लवकर बंद झाली होती.
Pandit Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येपेक्षाही भयंकर, काय होतं पंडित देशमुख हत्याकांड? बाळराजेंवर गंभीर आरोप