Akola News: नुकसानग्रस्तांच्या खात्यात १९१ कोटी मदत जमा; अकोला जिल्ह्यातील दोन लाख ४२ हजार शेतकऱ्यांना दिलासा
esakal November 22, 2025 02:45 AM

अकोला : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी नुकसान मदत व शेतकरी अनुदान वाटपांतर्गत जिल्ह्यातील दोन लाख ४२ हजार ३३५ शेतकऱ्यांच्या खात्यात १९१ कोटी ७ लक्ष ७ हजार निधी डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्यात आले.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचे नुकसान झाले. त्यानुसार शासनाकडे मदत निधीची मागणी करण्यात आली.

सततच्या पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे संयुक्त अहवालावरून समाेर आले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ९२ काेटींचा मदत निधी शासनाकडून जाहीर करण्यात आला. अतिवृष्टीचा फटका १ लाख २० हजार ६९७ शेतकऱ्यांना बसला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुद्धा पिकांचे नुकसान झाले.

Yeola News : येवल्यातील ६४ हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना ३८ कोटी रुपयांची मदत खात्यावर जमा करण्यास सुरुवात

नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा पाऊस होत आहे. सोयाबीनचे पिक हातून गेल्यानंतर आता कपाशीच्या पिकाचे सुद्धा नुकसान होत आहे.

अशी जमा झाली मदत

अकोला तालुक्यात ४१ हजार ७१ शेतकऱ्यांच्या खात्यात ३४ कोटी ६७ लक्ष ४४ हजार, तसेच अकोट तालुक्यात ३७ हजार ३३६ शेतकऱ्यांच्या खात्यात ३२ कोटी ९२ लक्ष ७८ हजार, बाळापूर तालुक्यात ३७ हजार ४४८ शेतकऱ्यांच्या खात्यात २८ कोटी ४८ लक्ष ३८ हजार निधी जमा झाला आहे. बार्शीटाकळी तालुक्यात २९ हजार १४८ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी १४ लक्ष ११ हजार, निधी, मूर्तीजापूर तालुक्यात ४२ हजार ६८५ शेतकऱ्यांच्या खात्यात २६ कोटी ५८ हजार, पातूर तालुक्यात २४ हजार ७४९ शेतकऱ्यांच्या खात्यात २० कोटी ७८ लक्ष ९२ हजार व तेल्हारा तालुक्यात २९ हजार ८६८ शेतकऱ्यांच्या खात्यात २३ कोटी ४ लक्ष ८६ हजार निधी जमा झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.