आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान ए विरुद्ध श्रीलंका ए 2 संघ आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. पाकिस्तानने रंगतदार झालेल्या सामन्यात श्रीलंकेवर 5 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. त्याआधी उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारतावर मात करत फायनलमध्ये प्रवेश केला. उभयसंघातील सामना टाय झाला. त्यानंतर बांगलादेशने भारतावार सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. त्यामुळे आता आशिया कप ट्रॉफीसाठी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात चुरस असणार आहे.
पाकिस्तानने बांगलादेशसमोर 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेनेही या धावांचा अखेरपर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीलंकेचे प्रयत्न 5 धावांनी कमी पडले. पाकिस्तानने श्रीलंकेला शेवटच्या बॉलवर दहावा आणि शेवटचा झटका दिला आणि ऑलआऊट केलं. श्रीलंकेचा डाव अशाप्रकारे 148 धावांवर आटोपला आणि पाकिस्तानचा 5 रन्सने विजय झाला.
श्रीलंकेच्या सलामी जोडीला चांगली सुरुवात मिळाली. मात्र ठराविक टप्प्यानंतर दोघेही आऊट झाले. लसिथ क्रोस्पुल याने 27 धावा केल्या. तर विशेन हलमबागे याने 29 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी पाकिस्तानसमोर गुडघे टेकले. श्रीलंकेच्या मिडल आणि लोअर ऑर्डरमधील 4 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर एकाला भोपळाही फोडता आला नाही. मात्र अखेरच्या क्षणी मिलन रथनायके याने शेवटच्या फलंदाजांसह श्रीलंकेला विजयी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र मिलनच्या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यामुळे मिलनची 40 धावांची खेळी व्यर्थ गेली. पाकिस्तानसाठी साद मसूद आणि सुफियान मुकीम या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या.
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 153 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानसाठी गाझी घोरी याने सर्वाधिक आणि नाबाद 39 धावा केल्या. माझ सदाकत याने 23 तर साद मसूद आणि अहमद दानियल या दोघांनी प्रत्येकी 22-22 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. श्रीलंकेसाठी प्रमोद मदुशन याने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ट्राविन मॅथ्यू याने 3 विकेट्स मिळवल्या. तर कॅप्टन दुनिथ वेल्लालागे आणि मिलन रथनायके या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.