साधेपणात श्रीमंती
esakal November 23, 2025 02:45 PM

प्रशांत ननावरे-nanawareprashant@gmail.com

आजूबाजूचे जग झपाट्याने बदलत असताना त्यांचा वेग पकडून काही मूलभूत गोष्टी जपणं मोठ्या कष्टाचे काम आहे. त्यासाठी स्वत:वर आणि इतरांवर विश्वास असावा लागतो. लोकांच्या आवडीनिवडी बदलत असल्या तरी ठरावीक गोष्टीच आवडणारी लोकं असतातच. त्याची जाणीव ठेवून व्यवसाय केल्यास अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने साध्य होतात.

अलिबाग एसटी स्टॅंडपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेली ‘मोघे खाणावळ’ याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. गेली ७२ वर्षे सकाळ-संध्याकाळ फक्त अतिशय साधे घरगुती पद्धतीचे जेवण देऊनही फक्त पंचक्रोशीत नव्हे तर त्याबाहेरही आपला नावलौकिक टिकवून ठेवला आहे. म्हणूनच अलिबागमध्ये आलेला माणूस शोध घेत मोघेंच्या खाणावळीत जातो आणि पोटभर जेवून आनंदाने बाहेर पडतो.

Yearly Horoscope: हे वर्ष तुम्हाला कसे जाणार..? नशिबाची दारं उघडणार की आणखी प्रतिक्षा..?

रत्नागिरी पालीजवळच्या साठळबांबर या गावातून एक शतकापूर्वी मोघे कुटुंब अलिबागमध्ये आले आणि येथेच स्थिरावले. गणेश मोघे स्वातंत्र्यपूर्व भारतात अलिबागमधील मारुती नाक्यावर छोटेखानी हॉटेल चालवत असत. तो काळ दिवाबत्तीचा होता. अलिबाग हे मुख्य नगर असल्याने त्या परिसरात दिवसा कामानिमित्त येणाऱ्या लोकांची खाण्या-पिण्याची सोय आणि त्यातून कुटुंबासाठी अर्थार्जन इतका साधा हिशेब. बाहेर जाऊन जेवणाची किंवा पार्ट्यांची पद्धत नव्हती. घरगुती कार्यक्रमांसाठी गरज भासलीस तर फार फार तर जेवणावळी उठायच्या आणि त्यातही समुदायाप्रमाणे खाद्यपदार्थ ठरलेले असायचे. गणेश मोघे यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा विनायक मोघे ही कामे करू लागले.

ऑर्डर दररोज नसायच्या, त्यामुळे गरज पडेल त्याप्रमाणे बाजारातून सामान आणले जाई. अलिबाग पट्ट्यात भातशेती करणाऱ्यांकडून थेट भात विकत घेऊन गरजेप्रमाणे गिरणीतून तांदूळ काढून आणला जात असे. विनायक मोघेंनी असंच एकदा भरपूर भात विकत घेतला आणि त्याचा उपयोगच झाला नाही. एवढ्या भाताचं करायचं काय, म्हणून त्यांनी घरीच खाणावळ सुरू केली. भागवतांनी बिवलकरांकडून घेतलेल्या मोठ्या बैठ्या कौलारू घरात मोघे भाड्याने राहायचे. तिथेच एका भागात खाणावळ आणि दुसऱ्या भागात वास्तव्य अशाप्रकारे १९५३ मध्ये मोघे खाणावळ अस्तित्वात आली. भाजी, वरण, ताक, लोणचं, कोशिंबीर, पापड, चपाती आणि भात इतकं साधं जेवण त्याकाळी मिळत असे. उन्हाळ्यात घरीच तयार केलेला आमरस असायचा, तोसुद्धा अमर्याद आणि आग्रहाने वाढला जाई. ब्राह्मणी पद्धतीचे, मसाल्यांचा कमीत कमी वापर असलेले आणि माफक दरात मिळणारे जेवण ही मोघेंच्या खाणावळीची खासियत.

अलिबागमध्ये मोघेंच्या आधी कुंटेंची खाणावळ होती, पण ती बंद होऊन आता अनेक वर्षे लोटली. विनायक मोघे लवकर निवर्तले असले तरी त्यांची मुले गजानन आणि गंगाधर यांनी तरुणपणीच व्यवसायाचा भार सांभाळला. त्यानंतर गजानन यांची मुले महेश आणि उमेश व्यवसायात उतरली आणि आता तर मोघेंच्या पाचव्या पिढीने हॉटेल मॅनेजमेंटचे रितसर शिक्षण घेऊन केटरिंग सर्व्हिसद्वारे पारंपरिक खाणावळीसोबतच व्यवसाय आणखी विस्तारायला सुरुवात केली आहे. मोघेंच्या खाणावळीत आजही फक्त शाकाहारी जेवणाची थाळी मिळत असली तरी बाहेरच्या जेवणाच्या ऑर्डर घेताना महाराष्ट्रीय, पंजाबी आणि गरजेप्रमाणे जेवण बनवून दिले जाते.

सुबक, टुमदार, सुरेख हे अलिबागसाठी चपखल बसणारे शब्द. इथली जुनी घरं टुमदार होती. ओटी, पडवी त्यानंतर बैठकीची खोली, माजघर, देवघर, स्वयंपाकघर, दोन्ही बाजूला वावरायच्या, साठवणीच्या खोल्या वेगळ्या, दगडी आणि लाकडी बांधकाम असलेलं जुनं देवघर, गजाच्या जुन्या खिडक्या अशा वास्तूमध्ये मोघे खाणावळ आहे. इथे आत जेवायला जाताना चपला बाहेर काढाव्या लागतात. घरच्यासारखं स्टीलच्या ताटात जेवण वाढून आणून दिलं जातं. बाजूला पाण्यासाठी तांब्या-पेला असतो.

विश्वासाची प्रचीती

जेवणाची थाळी साधीच असते, पण पोटभरीस होते. मसाल्यांचा वापर कमी असला तरी भाज्या चवदार लागतात. सकाळ संध्याकाळ सातही दिवस वेगवेगळी एक फळभाजी आणि एक उसळ असते. दही, ताक, मठ्ठा इथेच बनवला जातो. चटण्या, लोणची इथेच बनवल्या जातात. पहिला पाऊस पडल्यावर लोणचं घातलं जातं. त्यातही मीठ आणि तेल हेच अन्नसुरक्षारक्षक वापरले जातात. रोज वेगळी कोशिंबीर असते. ज्या तांदळामुळे खाणावळीची सुरुवात झाली तो वाडा कोलम तांदूळ आता बाजारातून घेतला जातो.

अलिबाग आता पूर्वीसारखं टुमदार राहिलेलं नाही. इथेही स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी झालेली आहे. तरीही मोघेंची खाणावळ आपलं अस्तित्व टिकवून आहे. खाणावळीतलं जेवण साधं वाटत असलं तरी आठ दशकं लोकांना त्याची गोडी लावणं सोपं काम नाही. मोघेंनी मोठ्या कष्टाने हा साधेपणा जपलाय.

अलिबाग आता पूर्वीसारखं टुमदार राहिलेलं नाही. इथेही स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी झालेली आहे. तरीही मोघेंची खाणावळ आपलं अस्तित्व टिकवून आहे. खाणावळीतलं जेवण साधं वाटत असलं तरी मोठ्या कष्टाने जपलेल्या या साधेपणातच त्याची श्रीमंती सामावली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.