महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट;केंद्र सरकारची मोठी आनंदवार्ता, 6 महत्त्वाचे फैसले एका क्लिकवर जाणून घ्या
Tv9 Marathi November 23, 2025 02:45 PM

विविध संस्था,बँका,आस्थापना, कारखाना, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने नुकतेच कामगार संहिता 2025(labour code) लागू केली. त्यातंर्गत महिलांना नोकरी, सुरक्षा आणि अधिकार मिळणार आहे. त्यासाठी मोठ्या सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे कार्यस्थळावर महिलांना अधिक सुरक्षा, विश्वासू वातावरण आणि पारदर्शकता जाणवेल. काय आहेत हे महत्त्वाचे बदल, जाणून घेऊयात.

1. कार्यस्थळी सुरक्षेवर अधिक भर

500 अथवा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांमध्ये आता सुरक्षा समिती गठीत करण्यात येईल. यामध्ये महिला प्रतिनिधी असतील. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे बदल करण्यात येतील. त्यांना सुरक्षित परिवहन, महिला सुरक्षा रक्षक, CCTV आणि या सर्वांचे व्यवस्थापन करणारी व्यवस्था या ठिकाणी तैनात असेल.

2. रात्र पाळीस मंजुरी

पहिल्यांदा देसात महिलांना सकाळी 6 वाजेपूर्वी आणि संध्याकाळी 7 वाजेनंतर कार्यालयात, कंपनी, कारखान्यात काम करता येईल. यामध्ये IT, आरोग्य सेवा, हॉस्पिटॅलिटी, विमान सेवा, ई-कॉमर्स, BPO सारख्या उद्योगात महिलांचा टक्का वाढेल. कंपन्या त्यांना सुरक्षित प्रवास, कंपनीत सुरक्षीत वातावरण पुरवतील. त्याची हमी घेतील.

3. समान वेतन आणि समान काम

नवीन कामगार कायदा संहितेत समान वेतन आणि समान काम यावर जोर देण्यात आला आहे. आता स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करता येणार नाही. समान काम आणि समान वेतन ही संकल्पना कोणत्याही भेदभावाशिवाय राबवावी लागेल. तर पहिल्यांदाच ट्रान्सजेंडरसाठी सुरक्षा देण्याची तजवीज करण्यात आली आहे.

4. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ग्रॅज्युएटी

यापूर्वी फिक्स्ड टर्म वा कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ मिळत नव्हता. ग्रॅज्युएटीसाठी सलग 5 वर्षांची नोकरी आवश्यक होती. आता केवळ एक वर्ष नोकरी करणाऱ्यांना पण ग्रॅज्युएटीचा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे IT, BPO, हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल सेक्टरमधील लाखो महिला कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल.

5. सुरक्षा समितीत महिला कर्मचारी

आता रात्र पाळी अथवा कंपन्यांमधील लैंगिक अथवा इतर हिसेंविरोधात महिलांना दाद मागता येईल. जर सहकर्मचारी अथवा वरिष्ठ हेतुपुरस्पर त्रास देत असतील. त्यांचा छळ करत असतील तर त्याविषयीची तक्रार त्यांना सुरक्षा समितीकडे करता येईल. या समितीत आता महिला प्रतिनिधी पण असतील.

6. वर्षातून एकदा आरोग्य तपासणी

सर्व कर्मचाऱ्यांची वर्षभरात एकदा मोफत आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. खासकरून महिलांसाठी ही आरोग्य तपासणी महत्त्वाची असते. कारण नोकरी आणि कुटुंब कबिला सांभाळताना त्या अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना आता मोफत आरोग्य तपासणीचा लाभ होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.