Sangli crime News: गोपनीय माहितीनंतर जत पोलिसांचा सापळा सहा देशी पिस्तूल, काडतुसे व दुचाकीसह ३.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
esakal November 23, 2025 02:45 PM

जत: शहरात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेली देशी बनावटीचे सहा पिस्तूल व जिवंत काडतुसांसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जत पोलिसांनी सापळा रचून जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे तीन लाख ४६ हजार इतकी आहे.

८ नोव्हेंबरला दुपारी १.४५ च्या सुमारास ही कारवाई केली होती. याबाबत जत पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल सुभाष काळेल यांनी आज फिर्याद दिली. मारुती ऊर्फ बबलू श्रीमंत गलांडे, (वय ३०, रा. विठ्ठलनगर गल्ली नं. ४ जत) व आकाश सुरेश हजारे, (२७, रा. घुट्टेवाडी, पाहुणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जतमध्ये देशी बनावटीची सहा पिस्तूल, काडतुसे जप्त.

Sangli Crime : कवठेमहांकाळला चाकू हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जत पोलिस ठाण्याकडील कर्मचारी सुभाष काळेल यांना गोपनीय बातमीदाराकडून शहरातील विजयपूर रस्त्यावरील एका पेट्रोलपंपावर बेकायदेशीर देशी बनावटीच्या पिस्तूलची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती.

याअनुषंगाने पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक व्ही. व्ही. पोटे, उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, पोलिस कर्मचारी अच्युतराव माने, सचिन शिंदे, विक्रम घोदे, नाथा खोत, सागर करांडे, सुभाष काळेल, सय्यद मुल्ला सायबरकडील अजय पाटील, अभिजित पाटील यांनी येथील एचपी पेट्रोलपंपासमोर सापळा रचून बबलू गलांडे याला ताब्यात घेतले.

Sangli News: उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या पंधरा प्रभागांसाठी ६७ ईव्हीएम मशीन; प्रत्येक प्रभागात १ राखीव

त्याची चौकशी केली असता तीन पिस्तूल, जिवंत काडतूस तर त्याचा मित्र आकाश हजारे यांच्याकडे तीन पिस्तूल व जिवंत काडतूस, असा तीन लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. दरम्यान, त्यांच्याकडे आणखी कोणा कोणास पिस्तूलची विक्री केल्याचा तपास सुरू आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण करत आहेत.

मध्य प्रदेश कनेक्शन...

जत पोलिसांच्या पथकाने ८ नोव्हेंबरला सापळा रचत बबलू गलांडे याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याचा साथीदार आकाश हजारे याचे नाव समोर आले. चौकशीत या देशी बनावटीच्या पिस्तूल खरेदीचे मध्य प्रदेशमधील रॅकेट समोर आले. यासाठी पोलिसांनी ही कारवाई गोपनीय ठेवत मध्य प्रदेश येथील कारखान्यात धाव घेतली. मात्र, पोलिस पोहोचण्याआधीच मुख्य संशयित पसार झाला. यामुळे मध्य प्रदेश येथील रॅकेटचा पर्दापाश होता होता फसला.

कोट

जत पोलिस ठाण्याने आजवर केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. शहरातील अशी बेकायदेशीर तस्करी उघडकीस आणण्यासाठी पथकांना आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांचा वॉच असणार आहे. या तस्करीत आणखी काही संशयित आहेत का याचा शोध घेत आहोत. लवकरच अशा गुन्हेगारीचा बीमोड करू.

- सचिन थोरबोले, पोलिस उपअधीक्षक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.