अक्षय शेलार-shelar.abs@gmail.com
पॉल थॉमस अँडरसनचा ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ पाहताना सर्वप्रथम जाणवणारी गोष्ट म्हणजे त्याचा सतत अस्वस्थ करणारा ताल. हा सिनेमा काही साध्या भावनांवर आधारित आहे, त्या म्हणजे भीती आणि दडपण. काही चित्रपट ज्या रीतीने आपल्याला कथेत ओढतात, तसा हा सिनेमा अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पात्रांच्या मनात, त्यांच्या जीवनात खेचतो आणि या पात्रांच्या जगात स्थैर्य किंवा थोडासाही विराम जवळजवळ अस्तित्वातच नाही. त्यामुळे सिनेमा पाहणं म्हणजे उत्कंठावर्धक कसरत करण्याचाच अनुभव आहे.
बॉब (लिओनार्डो डीकॅप्रियो) एकेकाळी एका क्रांतिकारक गटातील महत्त्वाचा सदस्य होता, मात्र कर्नल स्टीव्हन लॉकजॉ (शॉन पेन) जेव्हा त्याच्या आयुष्यात येतो, तेव्हा त्याला आपलं आयुष्य मागे टाकून त्याच्या लहान मुलीसह पलायन करावं लागतं. १६ वर्षांनी लॉकजॉ पुन्हा त्याच्या आयुष्यात येतो तेव्हाचा संघर्ष सिनेमात दिसतो. या पार्श्वभूमीवर सिनेमातलं जग जणू सतत विदारक भासतं. पात्रं संघर्ष करतात, निरर्थक भांडतात, नाती समजून घेण्याऐवजी तोडून टाकतात, मात्र या सगळ्यामागे लेखक-दिग्दर्शकाची एक स्पष्ट जाण आहे, ज्यात हे कोलाहल असलेलं जग मनुष्याच्या असुरक्षिततेच्या भावनेतून उभं आहे. त्यातल्या पॅरानोयामध्ये प्रत्येक छोटं संकटही प्रचंड मोठं वाटतं आणि म्हणूनच शीर्षकातील ‘बॅटल’ हा शब्द नुसतं रूपक न राहता एक अत्यंत जिवंत वास्तव बनतो.
गमतीची गोष्ट म्हणजे हा सिनेमा जितका अस्वस्थता तयार करणारा आहे, तितकाच विनोदीही आहे. या विनोदात पारंपरिक विनोदाचा अंश नाही; उलट तो परिस्थितीच्या विसंगतीतून जन्मलेला आहे. पात्रं जेव्हा स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांचाच गोंधळ बघून हसू येतं. हा विनोद दिलासा देणारा नाही, तर त्यातून एक प्रकारचा निरीक्षणात्मक उपहास निर्माण होतो. या विनोदामुळे सिनेमा एकाच वेळी हलकाफुलकाही वाटतो आणि गंभीरही. हा विनोद एकूणच परिस्थितीच्या अस्वस्थतेचं प्रतीक बनतो. पात्रं जगाशी असलेला संघर्ष थांबवू पाहतात, पण त्यांच्या आतल्या गोंधळाशी लढणं थांबत नाही. त्यामुळे सिनेमा केवळ घटनांची मालिका न राहता, मानसिक व प्रत्यक्ष संघर्षांची न संपणारी जंत्री बनतो.
या सततच्या अस्थिरतेत आणखी एक महत्त्वाचा थर म्हणजे पात्रांमधील नाती. ‘वन बॅटल आफ्टर अनादर’मधील नातेसंबंध हे ‘सुटकेचे’ नसून ‘ओझ्याचे’ आहेत. कोणाच्याच आयुष्यात कुणीही स्थिर नाही. नाती जुळतात, पण टिकत नाहीत. तुटतात, पण तुटूनही संपत नाहीत. पालकत्वाची भावना आणि त्यासोबत येणारी जबाबदारी आणि काळजी आपल्याला जाणवते. प्रत्येक संवादामागे अविश्वासाची धूसर सावली आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या या भीतीला आणि अस्थिरतेला पूरक ठरतं ते म्हणजे जॉनी ग्रीनवूडचं पार्श्वसंगीत. इथलं संगीत जणू अस्थिर विचारांसारखं, भीतीच्या दडपणाखालील नाडीच्या ठोक्यांसारखं वाटतं.
मालिकेतल्या दृश्यरचनांमध्येही सातत्यपूर्ण चिंतेचा स्वभाव कायम आहे. बॉब दारू आणि गांजाच्या अंमलाखाली असल्याने ही चिंता अनेक पटींनी वाढते आणि भवतालच्या जगातही अनुनाद पावते. संशय आणि अस्पष्टता पदोपदी दिसू लागते. ही चिंता राजकीय स्वरूपाचीही आहे. उजव्या विचारसरणीचा प्रभाव, कल्ट-सदृश गटांमधील लोकांचं अमेरिकेत वर्चस्वस्थानी असणं, विचार आणि कृती यांमधील विसंगती या स्तरावरही अर्थनिर्मिती होते. त्यामुळे पॉल थॉमस अँडरसनचा हा राजकीय अन्वयार्थ असलेला सिनेमा उत्तमरीत्या बनवलेला आहे म्हणणं म्हणजे अगदी उघड सत्य अधोरेखित करण्यासारखं आहे. दोन श्वेतवर्णीय पुरुषांना घेऊन सांगितलेली ही गोष्ट त्यांनाच एकमेकांसमोर उभं करून त्यांची पुष्कळ खिल्ली उडवते आणि असे करत असतानाच समकालीन अमेरिकेचं एक विलक्षण प्रभावी चित्र समोर साकारते.
Premium: Interview: 'एनएसडी' मध्येही मी अनेक चुकीच्या गोष्टी शिकले, पण..; अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांची रोखठोक मुलाखत‘वन बॅटल आफ्टर अनादर’ पाहताना कथा कुठे चालली आहे हे समजण्यापेक्षा कथेतलं मनोविश्व कसं वाटतं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. त्या मनोविश्वात तणाव आहे, दडपण आहे, विनोद आहे आणि सतत एक प्रश्न आहे, तो म्हणजे पुढचं युद्ध कोणतं? आणि त्याला सामोरं जाईपर्यंत आपण स्वतःला सावरू शकतो का? सिनेमा अस्पष्टतेतच आपलं सौंदर्य शोधतो. शेवटाकडे जाताना सिनेमा स्पष्ट उत्तरं देत नाही. लढाई थांबते असं वाटतं आणि पुन्हा एक नवीन तणाव उभा राहतो. त्यामुळेच शेवटाकडे पात्रांसोबतच प्रेक्षकालाही तीव्र भीतीची भावना स्पर्शून जाते. जीवनातील सततच्या संघर्षांचा आलेख दिग्दर्शक दाखवतो. एका लढाईनंतर दुसरी लढाई आणि त्याचदरम्यान मिळणारे छोटे शांत क्षणच खरं तर जगण्याची जागा बनतात. विसंगती, विनोद, भीती आणि अपूर्णतेचा एक प्रकारचा दृक्-श्राव्य ताल धरणारा हा सिनेमा पाहिल्यावर त्या शांत क्षणांचा अनुभव अधिक समृद्ध होतो, हे नक्की!