हुंडा मागणं, घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण आजही देशाच्या काही भागात प्रथेच्या नावाखाली हुंडा दिला जातो, मागितला जातो. पण आता हुंडा प्रथेच्या विरोधात मजबूत संदेश देणारी एक घटना समोर आली आहे. एका नवरदेवाने लग्नात दिले जाणारे 31 लाख रुपये हात जोडून विनम्रतेने परत केले. या नवरदेवाचं सर्वत्र कौतुक होत आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये हे अनोखं आणि प्रेरणादायक प्रकरण समोर आलं आहे. बुढाना तालुक्यातील नगवा गावत हा विवाह होता. इथे राहणाऱ्या अवधेश राणाने लग्नात हुंड्यात मिळणारी 31 लाख रुपये रक्कम हात जोडून विनम्रतेने परत केली. नवरदेवाच्या या कृतीच लग्नाला आलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट करुन कौतुक केलं.
अवधेश राणाचं लग्न शहाबुद्दीन पुर गावात राहणाऱ्या अदिति सिंहसोबत बँक्वेट हॉलमध्ये 22 नोव्हेंबरला संपन्न झालं. या लग्न सोहळ्यादरम्यान वधू पक्षाच्या लोकांनी अवधेश राणाला तिलक सोहळ्यादरम्यान 31 लाख रुपयाची रक्कम देऊ केली. पण सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत अवधेश राणाने हात जोडून ही रक्कम परत केली. त्यानंतर नवरदेवाची ही कृती चर्चेचा विषय बनली आहे. हुंड्याचीआस बाळगून असलेल्यांना ही मोठी चपराक आहे.
मुलगी नुकतीच MSC झाली
नवरी अदिति सिंह नुकतीच MSC झाली आहे. कोरोना काळात अदितिचे वडिल सुनील यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अदिति आणि तिचा भाऊ अभिनव राणा शहाबुद्दीनपुर गावात आजोबा सुखपाल यांच्याकडे राहत होते. आजोबा सुखपाल यांनी अदितिची लग्न बुढानाच्या अवधेश राणासोबत ठरवलं.
हुंडा नाकारणारा नवरदेव काय म्हणाला?
अवधेश राणा म्हणाला की, “माझा हुंडा प्रथेला विरोध आहे. आमचं कुटुंब आर्थिक दृष्टया संपन्न आहे. पण हुंडा प्रथा बंद झाली पाहिजे. अनेक मुलींचे वडिल आयुष्यभर कमाई करुन सुद्धा ही रक्कम देऊ शकत नाहीक, कर्ज काढतात. म्हणून हुंडा प्रथा बंद झाली पाहिजे”