बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा ही कायमच चर्चेत असते. चित्रपटसृष्टीपासून लांब असलेली प्रिती खासगी आयुष्यामुळे आणि तिच्या बिझनेसमुळे चर्चेत राहिली आहे. तिची IPLमधील टीमही चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या एका वेगळ्या कारणामुळे प्रिती चर्चेत आहे. प्रितीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एका घराच्या डिलमध्ये प्रितीला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. आता नेमकं काय झालं आहे? चला जाणून घेऊया…
काही दिवसांपूर्वी प्रिती झिंटाने वाद्रे येथील परिश्रम इमारतीतील एक अपार्टमेंट खरेदी केले होते. 21 नोव्हेंबर 2025 रोजी नोंदवलेला हा व्यवहार CME Matrix कडून मिळालेल्या दस्तऐवजांमध्ये नोंदवला गेला आहे. अभिनेत्रीने 2023 मध्ये हा फ्लॅट कीस्टोन रिअल्टर्स (रुस्तमजी ग्रुप) कडून 17.01 कोटी रुपयांना खरेदी केला होता आणि या महिन्यात तिने हा फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट तिने विशाल कल्याण मिर्चंदानी यांना विकला आहे.
नेमका काय तोटा झाला?
प्रितीचे हे अपार्टमेंट 11 व्या मजल्यावर आहे आणि त्याचे क्षेत्रफळ सुमारे 1,474 चौरस फूट आहे. यासोबत दोन पार्किंग स्पेसही आहेत. मूळ खरेदी किंमतीपेक्षा हा व्यवहार कमी किंमतीत झाला असून, यात जवळपास 3 कोटी रुपयांचे मूल्यघट (डिप्रिशिएशन) दिसते. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, ही रक्कम त्या पुन्हा दुसऱ्या लक्झरी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणार आहेत. प्रितीने हा फ्लॅट 14.08 कोटी रुपयांना विकला आहे.
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सध्या आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओची पुनर्रचना करत आहेत. गेल्या काही महिन्यांत मुंबईत अनेक अभिनेत्यांनी कोट्यवधींच्या प्रॉपर्टी खरेदी-विक्री केल्या आहेत. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची नावे यात विशेष उल्लेखनीय आहेत. अमिताभ बच्चन यांनी नुकतेच गोरेगावातील दोन जोडलेले फ्लॅट 12 कोटी रुपयांना विकले आहेत. रिअल इस्टेट गुंतवणूक ही सेलिब्रिटींच्या मालमत्ता नियोजनाचा महत्त्वाचा भाग कायम आहे. सतत होणारे प्रॉपर्टी व्यवहार हे दर्शवतात की, चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या पलीकडे उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये विविधता आणण्याचा ट्रेंड वाढत आहे.
प्रिती झिंटा विषयी
प्रिटी झिंटा 1990 च्या उत्तरार्धात आणि 2000 च्या सुरुवातीला बॉलिवूडच्या सर्वात ओळखल्या जाणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक होती. ‘दिल से’ आणि ‘सोल्जर’ या चित्रपटांतून पदार्पण केल्यानंतर तिने ‘कल हो ना हो’, ‘वीर-झारा’, ‘कोई मिल गया’ आणि ‘लक्ष्य’ अशा चित्रपटांत दमदार अभिनय केला. तिच्या भूमिका नेहमीच ऊर्जा, भावनिक स्पष्टता आणि सबल स्त्री-व्यक्तिरेखा यासाठी लक्षात राहिल्या. नंतर तिने आंतरराष्ट्रीय प्रकल्प, निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले. तरीही भारतीय चित्रपटसृष्टीत तिचा प्रभाव कायम आहे.