Dharmendra : घरातच आयसीयू, त्यांचं शरीर.. धर्मेंद्र यांच्याबद्दल अभिनेत्याचा मोठा खुलासा, सनी-बॉबीशी काय झालं बोलणं? थेट सांगितलं…
Tv9 Marathi November 28, 2025 06:45 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले, वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील घरी अखेरचा श्वास घेतला, मात्र त्यांच्या जाण्यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शांतपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. काल म्हणजेच गुरूवारी देओल कुटुंबियांकडून धर्मेंद्र यांच्या आठवणीत एक प्रेअर मीट अर्थात प्रार्थना सभा ठेवण्यात आली होती. तेथे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र हे जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली होती, तर त्यांना घरी सोडण्यात आल्यावर काही अभिनेते, कलाकार भेटीसाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी घरी पोहोचले होते. त्यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना.

मुकेश खन्ना यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना दिला उजाळा

अभिनेता मुकेश खन्ना यांनी एका यूट्यूब व्हिडिओ व्लॉगमध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत झालेल्या शेवटच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून धर्मेंद्र यांना जेव्हा घरी सोडण्यात आलं, तेव्हा संपूर्ण मेडिकल सेटअप सोबत होता. त्यावेळी मुकेश खन्ना यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. त्याबद्दल मुकेश खन्ना व्लॉगमध्ये बोलले.  ‘ (त्यांच्या) कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्यासाठी ICU सारखा सेटअप केला होता. तेव्हा सगळ्यांना आशा वाटत होती की धर्मेंद्र यांना बरं वाटेल, ते पुन्हा उठतील. 5-6 दिवसांपूर्वी मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा धर्मेंद्र यांना घरी आणण्यात आलं होतं. घरातच ICU प्रमाणे अरेंजमेंट करण्यात आली होती. धर्मेंद्र जी यांच्याशी अगदी नीट भेट होणार नाही, याची मला कल्पना होती, तरीही तिथे जाणं गरजेचं होतं असं मला वाटलं, ‘ असं मुकेश खन्ना म्हणाले.

सनी-बॉबीशी काय झालं बोलणं ?

त्यावेळी आपली सनी आणि बॉबी देओल यांच्याशी भेट झाली असंही मुकेश खन्ना यांनी नमूद केलं. ‘ मी त्या दोघांना म्हणालो, ते (धर्मेंद्र) खूप मजबूत आहे, ते यातून नक्की बाहेर येतील, या आजाराला मात देऊन ते पुन्हा उभे राहतील, असं माझं त्यांच्याशी बोलणं झालं. पण शेवटी देवाची मर्जी.  त्याच्या इच्छेप्रमाणेच सगळं घडतं. धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला, कारण सर्वांना असं वाटत होतं, आशा होती, की ते बरे होतील. पण त्यांचं शरीर हरलं. असं असलं तरी आत्मा असतो तो पुढे जातो, त्यांचा आत्मा खूप सुंदर होता ‘ असंही मुकेश खन्ना यांनी नमूद केलं.

यावेळी बोलताना मुकेश खन्ना यांनी ‘तहलका’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान धर्मेंद्रसोबत घालवलेल्या वेळेबद्दल्या आठवणीही सांगितल्या. त्यांनी धर्मेंद्र यांचा साधेपणा आणि नम्रतेचे कौतुक केले. हे दोन गुण धर्मेंद्र यांचे सर्वात मोठे बलस्थान होते असेही मुकेश खन्ना म्हणाले. शेवटच्या दिवसांत जेव्हा ते आजारी होते, तेव्हाही ते सकारात्मक होते, असंही ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.