विस्तारित ठाणे स्थानकाचा खर्च विस्तारला
esakal December 08, 2025 03:45 AM

विस्तारित ठाणे स्थानकाचा खर्च विस्तारला
रेल्वेचा दिरंगाईचा फटका २४५ कोटींवर ः ठाणेकर प्रवाशांची प्रतिक्षा लांबली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ ः ठाणे स्थानकाचा भार कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या विस्तारित स्थानकाची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या कामासाठी दिरंगाई होत असून, खर्चाचा भारही १२० कोटींवरून २४५ कोटींवर पोहोचला आहे.
ठाणे स्थानकातून रोज सात लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. हा भार कमी करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड यादरम्यान विस्तारित स्थानक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. मनोरुग्णालयाच्या भूखंडावर हा प्रकल्प उभारला जात आहे. सुरुवातीला भूखंडाचा वाद न्यायालयात पोहोचला. त्यातून मार्ग काढल्यानंतर स्मार्ट सिटीअंतर्गत ठाणे महापालिकेने स्थानक उभारणीचे काम युद्धपातळीवर केले. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने त्यांच्या ६० टक्के भागाचे काम पूर्ण केले आहे, मात्र रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे स्थाकासाठी एक इंचाचा रुळही टाकण्यात आलेला नाही. काम पुढे सरकत नसल्याने यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
३ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत या स्थानकाच्या रेल्वे भागाचा खर्च आणि काम रेल्वे मंत्रालय करेल हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र मुंबई विभागातील अधिकारी अद्याप मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. सूचनांअभावी ते काम सुरू करू शकत नाहीत, अशी सबब सांगत आहेत. या विलंबाचा परिणाम असा झाला की मूळ अंदाजे १२० कोटींचा हा प्रकल्प आता २४५ कोटींपेक्षा जास्त झाला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. स्मार्ट सिटी मिशन मार्च २०२५ मध्ये संपले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता अतिरिक्त निधी उरलेला नाही. जर त्वरित काम सुरू केले नाही, तर निधीअभावी प्रकल्प रखडण्याची भीती खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.

निधी उपलब्ध करून द्या
रेल्वे मंत्रालयाने मुंबई विभागाला तत्काळ अधिकृत सूचना जारी कराव्यात, जेणेकरून रेल्वेला त्यांचे काम सुरू करता येईल, अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसेच वाढलेला खर्च लक्षात घेता, आवश्यक निधी त्वरित मुंबई विभागाला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.