Devendra Fadnavis : सोमवारपासून (8 डिसेंबर) राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. नागपूरला एकूण सात दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच विरोधकांच्या बाजूने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर वेगवेगळे आरोप केले. राज्यात शेतकरी हवालदील आहे, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. आता याच आरोपांना सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडे बोलण्यासाठी विषय नाही. त्यांची पत्रकार परिषद निराशेने भरलेली होती, असा पलटवार फडणवीस यांनी केली.
विरोधकांची पत्रकार परिषद निराशेने भरलेलीफडणवीस यांनी पत्रकार परिषदेत यावेळच्या अधिवेशनात नेमकं काय घडणार? किती विधेयके सभागृहाच्या पटलावर मांडली जाणार? याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. ‘विरोधकांची पत्रकार परिषद ही निराशेने भरलेली आणि त्रागा करणारी होती. त्या पत्रकार परिषदेत अनेक गमती झाल्या. काँग्रेस पक्ष प्रामाणिक होता, अशी उपरती भास्कर जाधव यांना झाली. विरोधकांना पत्रावर सह्या करायलाच कोणी भेटले नाही,’ अशी टोलेबाजी फडणवीस यांनी केली. तसेच आज वडेट्टीवार विदर्भावरही बोलले. पण मला सांगायचे आहे की 2014 सालापूर्वीचा आणि 2014 सालानंतरचा विदर्भ त्यांनी बघावा. विदर्भात काय बदल घडलेला आहे, हे त्यांना समजेल, असा पलटवारही त्यांनी केला.
सर्व प्रश्नांना आम्ही समर्पक उत्तर देऊपुढे अधिवेशनाबाबत बोलताना, विरोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना आम्ही समर्पक उत्तर देऊ. उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. अधिवेशनाचा कालावधी खूपच कमी आहे, अशी टीका विरोधक करत आहेत. परंतु शनिवार, रविवारीदेखील अधिवेशन होणार आहे. पळून जाण्याची राज्य सरकारची मानसिकता नाही. सध्या सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही, असा आक्षेपही महाविकास आघाडीने उपस्थित केला. यावर बोलताना विरोधी पक्षनेता निवडीचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, असे फडणवीस म्हणाले.