दुबार मतदारांना पालिकेचा सल्ला
कुठल्याही एका केंद्रात मतदान करण्याचे आवाहन
बोळिंज, ता. १३ (बातमीदार)ः वसई विरार शहरात ५० हजारांहून अधिक दुबार मतदार आहेत. या मतदारांची यादी पालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तसेच ज्यांची नावे दुबार आहेत त्यांनी आवडीच्या कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वसई-विरार महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये ५० हजारांहून अधिक दुबार मतदार आहेत. या दुबार मतदारांमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे दुबार नावे असलेल्या मतदारांना कुठल्याही एका मतदान केंद्रामध्ये मतदानाची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. वसई-विरार महापालिकेने ५० हजार दुबार मतदारांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. मतदारांनी आपली नावे तपासून कुठलेही एक मतदान केंद्र निवडून, मतदान करावे, असे आवाहन पालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.