नायगाव-पापडी पुलाला तडे
esakal December 14, 2025 02:45 PM

नायगाव-पापडी पुलाला तडे
डम्परमधील वाहतुकीवर स्थानिकांचे आक्षेप
विरार, ता. १३ (बातमीदार)ः नायगाव येथे नवीन रेल्वेपुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव सुरू आहे. डम्परच्या वाहतुकीमुळे पुलाला तडे गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यानुसार प्रशासनाने या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक काही काळासाठी बंद केली आहे.
नायगाव, पाणजू, पाळी, दारपाळे, खोचिवडा, किरवली, पापडीमार्गे वसईकडे जाण्यासाठी नायगाव येथे नवीन रेल्वेपुलाचे काम सुरू आहे. या मार्गावर अनेक शाळा, मंदिरे, चर्च तसेच नायगावचे होलसेल मासळी मार्केट आहे. त्यामुळे वर्दळ असलेल्या परिसरात डम्परमधून मातीची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे जड वाहनांमुळे रस्त्यांवर तीव्र कंप निर्माण होत असून, आसपासच्या घरांच्या भिंती हादरत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेने ५० वर्षांपूर्वी हा पूल बांधला होता, परंतु आता पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने पूल कमकुवत झाला आहे.
----------------------------------
अपघातांची शक्यता
या परिसरात शाळा, बाजारपेठ असल्याने विद्यार्थी, महिलांचे, ज्येष्ठ नागरिकांचा वावर अधिक आहे. त्यामुळे अवजड वाहनांमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे ही वाहतूक तातडीने दुसऱ्या मार्गाने वळवावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.
-----------------------------
आठ वर्षांपूर्वी महापालिकेकडे पुलाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती, परंतू हा पूल बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. असे त्या वेळी सांगण्यात आले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पनाही दिली होती. अशातच मातीच्या गाड्यांमुळे पूल कमकुवत झाला आहे.
-ॲड. ज्योती धोंडेकर, माजी नगरसेविका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.