पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने डॉ. कुसुमताई गोखले स्मृती व्याख्यान
कल्याण (वार्ताहर) : पर्यावरण दक्षता मंडळ, एन्विरो व्हिजिल, मुंबई विद्यापीठ, असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस आणि विद्याप्रसारक मंडळ संचलित बी.एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. १३) डॉ. कुसुम गोखले स्मृती व्याख्यान पतंजली सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास पर्यावरण दक्षता मंडळाच्या अध्यक्ष डॉ. मानसी जोशी, उपाध्यक्ष डॉ. संजय जोशी, पर्यावरण दक्षता मंडळाचे सदस्य डॉ. उमेश मुंडले, बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांजरमकर, डॉ. चित्रा जोशी, डॉ. चैतन्य गोखले, प्रमुख वक्त्या डॉ. शीतल पाचपांडे आणि डॉ. जयश्री मेनन उपस्थित होत्या.
डॉ. मानसी जोशी यांनी पर्यावरण शाळा, निसर्गमेळा, ग्रीन लव्हर क्लब, ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी, देवराई, माझा तलाव आणि स्वच्छ खाडी अभियान अशा विविध उपक्रमांची माहिती दिली व सर्वांनी निसर्गाशी नाते जपण्याचे आवाहन केले. यानंतर रुपाली शाईवाले यांनी स्वच्छ खाडी अभियानअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या जनजागृती सत्रे, क्रीक सफारी, निसर्गभ्रमंती, खाडी पाणी नमुना परीक्षण, माझा तलाव मोहीम आणि विहीर सर्वेक्षण याबाबत माहिती दिली.खाडी स्वच्छ करण्यापेक्षा खाडीत कचरा टाकणे थांबवले, तर खाडी आपोआप स्वच्छ राहील, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला.