10849
तालुका वाचक स्पर्धेत
प्रसाद खडपकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १५ ः येथील नगरवाचनालय व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वेंगुर्ले तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत प्रसाद खडपकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेला ‘गंगाराम गवाणकर यांची कोणतीही साहित्यकृती’ हा विषय होता.
स्पर्धेत साध्वी मिंडे यांनी द्वितीय, विशाखा वेंगुर्लेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रसाद खडपकर यांनी ‘वात्रट मेले’ तसेच साध्वी मिंडे आणि विशाखा वेंगुर्लेकर यांनी ‘संगीत विठ्ठल विठ्ठल’ या पुस्तकावर परीक्षण केले. तिन्ही विजेते २० डिसेंबरला होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, परीक्षक महेश बोवलेकर, कैवल्य पवार, माया परब, मयुरेश सौदागर आणि वाचक उपस्थित होते. अनिल सौदागर यांनी स्पर्धेच्या परीक्षणाविषयी माहिती देऊन जिल्हापातळीवर यशस्वी होण्यासाठी स्पर्धकांना मार्गदर्श केले.
...................
10850
संजय घोगळे यांना
‘कोकणरत्न’ सन्मान
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १५ ः येथील लेखक, व्यंगचित्रकार तसेच अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांना ज्येष्ठ पत्रकार सचिन कळझुणकर यांच्या हस्ते मुंबई आझाद मैदान येथे ‘कोकणरत्न’ पदवी प्रदान करण्यात आली. या पदवी प्रदान सोहळ्याला स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक संजय कोकरे, मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, राजेंद्र सुर्वे, दिलीप लाड, सुभाष राणे आदी पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. घोगळे यांनी मुंबई तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून गौरवास्पद कामगिरी केली आहे. व्यंगचित्रकार म्हणून त्यांची दखल अमेरिकन वेबसाईटवरही घेण्यात आली असून लेखक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. कोकणरत्न पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांवरून अभिनंदन होत आहे.