आयपीएल 2026 स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. दहाही फ्रेंचायझींनी आवश्यक असलेल्या खेळाडूंना आपल्या संघात बोली लावून घेतलं आहे. आता आयपीएल स्पर्धा किती सुरु होणार? याचे वेध लागले आहेत. तर 19व्या पर्वासाठी आयपीएल स्पर्धेची तारीख निश्चित झाली आहे. या स्पर्धेला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच अंतिम सामना मे महिन्याच्या अखेरीस होणार आहे. दोन महिने हा थरार रंगणार आहे. भारतात टी20 विश्वचषक देखील होणार आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित केलेला टी20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होईल. अंतिम सामना 8 मार्च रोजी होईल. टी20 विश्वचषक संपल्यानंतर 17 दिवसांनी आयपीएल सुरू होईल. मागच्या वर्षी 22 मार्च 2025 रोजी स्पर्धा सुरु झाली होती. पण पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थिती होती. त्यामुळे ही स्पर्धा 3 जून 2025 पर्यंत चालली होती. पण यंदा या स्पर्धेची सांगता 31 मे पर्यंतच होईल. शनिवार रविवार आणि मधल्या वारी डबल हेडर सामने असण्याची शक्यता आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, फ्रँचायझी प्रतिनिधी आणि आयपीएल अधिकाऱ्यांमधील बैठकीत तारखा निश्चित केल्या जातील. पण लिलावापूर्वी आयोजित ब्रीफिंगमध्ये आयपीएलचे सीईओ हेमांग अमीन यांनी या तारखांची औपचारिक माहिती दिली. स्पर्धेचा उद्घाटन सामना गतविजेत्या संघाच्या घरी होणार आहे. बंगळुरूचे एम चिन्नास्वामी स्टेडियम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यासह होणाऱ्या कर्टन-रेझरचे आयोजन करेल. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ही स्पर्धा 67 दिवसांसाठी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयपीएल स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीनने सर्वाधिक भाव खाल्ला. त्याच्यासाठी केकेआरने 25.20 कोटी मोजले आहेत. तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज याच्यासाठी केकेआरने दुसरी सर्वाधिक मोठी बोली लावली. केकेआरने त्याच्यासाठी 18 कोटी मोजले. तर अनकॅप्ड प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे तिसरे महागडे खेळाडू ठरले. या दोघांना चेन्नई सुपर किंग्सने 14.20 कोटी दिले. आतापर्यंत 20 खेळाडूंना कोट्यवधींच्या घरात पैसे मिळाले आहेत. त्यात 11 खेळाडू विदेशी असून 9 खेळाडू भारतीय आहेत.