शहरातील चौकांनी घेतला मोकळा श्वास
esakal December 17, 2025 04:45 AM

शहरातील चौकांनी घेतला मोकळा श्वास
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बॅनर, पोस्टरवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच ठाणे महापालिका प्रशासनाने आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. गेल्या २४ तासांत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक मोहीम राबवत शहरातील विविध भागांतून तब्बल ९४२ राजकीय बॅनर, पोस्टर्स आणि झेंडे हटवले आहेत. या कारवाईमुळे शहरातील चौकांनी आणि नाक्यांनी विद्रुपीकरणातून मोकळा श्वास घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात ‘भावी’ आणि ‘फिक्स’ नगरसेवकांच्या बॅनरबाजी ऊत आला होता. वाढदिवस, पद नियुक्ती आणि कामाचे श्रेय घेणाऱ्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते; मात्र सोमवारी (ता. १५) सायंकाळी आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने आपला मोर्चा या अनधिकृत फलकांकडे वळवला. शासकीय इमारती, सार्वजनिक चौक आणि खासगी मालमत्तांवरील राजकीय चिन्हे हटवण्यास प्राधान्य देण्यात आले.

फलकांमुळे शहरातील चौक व नाके विद्रूप होतात. अशा बेकायदा फलकांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून फारशी कारवाई होत नसल्याची ओरड सातत्याने होत असते. त्यात ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादा, भाई, इच्छुकांनी भावी नगरसेवक, फिक्स नगरसेवक अशा आशयाचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शहरात राजकीय बॅनरबाजीचे प्रमाण वाढले होते. शहरातील नाक्यानाक्यांवर आणि चौकाचौकात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फलक झळकताना दिसून येत होते. तर कुठे केलेल्या कामाचे श्रेय घेणारे फलकदेखील लावण्यात आले होते. यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याचे चित्र होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तसेच पालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे, पोस्टरवर कारवाईचा बडगा उगारला.

प्रभाग समितीनिहाय कारवाईचा तपशील
प्रभाग समिती कारवाई संख्या
नौपाडा कोपरी ६०
वागळे २५७
लोकमान्य सावरकर १८०
वर्तकनगर २७५
माजिवडा मानपाडा १७
उथळसर ३५
कळवा २१
मुंब्रा २५
दिवा ७२

सर्वात जास्त कारवाई वर्तकनगर आणि वागळे इस्टेट परिसरात करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.