पुणे-नाशिक महामार्ग भोसरीत ठरतोय धोकादायक
esakal December 17, 2025 04:45 AM

भोसरी, ता. १६ ः येथील धावडे वस्ती आणि चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर हे पुणे-नाशिक महामार्गाने विभागले गेले आहे. धावडेवस्ती, इंद्रायणीनगर परिसरात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, कामासाठी जाणाऱ्या महिला-पुरुष यांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांना वाहनांची वर्दळ असलेला धोकादायक पुणे-नाशिक महामार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. धावडेवस्ती जवळ या महामार्गावर भुयारी मार्ग बांधण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.
भोसरीतील धावडेवस्तीमध्ये भैरवनाथ माध्यमिक विद्यालय व इंद्रायणीनगरमध्ये महापालिकेचे वैष्णोमाता विद्या मंदिर आहे. या शाळेत सद्गुरूनगर, चक्रपाणी वसाहत, महादेवनगर आदी भागातून विद्यार्थ्यांना पुणे-नाशिक महामार्ग ओलांडून यावे लागते. मात्र धावडेवस्तीजवळ रस्त्यावर मारलेल्या झेब्रा क्रॉसिंगच्या पांढऱ्या पट्ट्या बुजलेल्या आहेत. त्याचप्रमाणे येथे गतिरोधकही नाही. या महामार्गावर वाहने भरधाव वेगात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
विद्यार्थी, महिला-पुरुष कामगार रस्ता दुभाजक ओलांडून जातात. अचानक भरधाव वेगात वाहन आल्यास त्यांची धावपळही होते. या ठिकाणी यापूर्वीही छोटे-मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. सेवा रस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

सेवा रस्त्याचा अभाव
राष्ट्रीय महामार्ग महामंडळाद्वारे पुणे-नाशिक महामार्गाचे आठ पदरीकरण होणार आहे. मात्र काही वर्षांपासून हे काम प्रलंबित आहे. त्यामुळे भोसरीत पुणे-नाशिक महामार्गावर सेवा रस्त्याचाही अभाव दिसून येतो.


पुणे-नाशिक महामार्गावर मुला-मुलींना शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी जावे लागते. एखाद्या वेळेस कामानिमित्त नाही जमल्यावर विद्यार्थ्यांचा शाळेचा खाडा होतो. महापालिकेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी येथे पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग उभारला पाहिजे.
-शांता सोनवणे, पालक

राष्ट्रीय महामार्ग महामंडळाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील जागा ताब्यात घेऊन हस्तांतरित केली आहे. महामंडळाला येथील रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी मंजुरीही मिळाली आहे. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल. त्यानंतर महामंडळाद्वारे या रस्त्यावर सेवा रस्त्यासह वाहतुकीसाठी विविध नियोजन करण्यात येईल.
-बापू गायकवाड, सहशहर अभियंता, बीआरटीएस.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.