भिवंडीतील दोघांकडून पिस्तूल, काडतुसे जप्त
ठाणे, ता. १६ : अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन तरुणांना ठाणे शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने राबोडी परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. राबोडी येथील केसर मिल परिसरात दोन तरुण पिस्तूल घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे पोलिस हवालदार धनराज घोडके आणि पोलिस शिपाई योगेश क्षीरसागर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १४ डिसेंबरच्या मध्यरात्री सापळा रचला आणि दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
अरबाज शकील अन्सारी (२५), तौफिक गुलाम शेख (२५) या ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्याची एकूण किंमत ३४ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्वेता चव्हाण करत असून, हे तरुण शस्त्र कशासाठी आणि कोणाला विकण्यासाठी आणले होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.