वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मणिपूरला भारतापासून तोडून स्वतंत्र राष्ट्र बनविण्याचा प्रयत्नात असणारी फुटीरवादी संघटना मणिपूर स्टेट कौन्सिलच्या दोन नेत्यांवर प्रवर्तन निदेशालयाच्या (ईडी) तुकडीने धाडी घातल्या असून महत्वाचा पुरावा हस्तगत केला आहे. येंबेन बिरेन आणि नरेंगबाम समरजित अशी या दोन नेत्यांची नावे आहेत. बिरेन यांनी स्वत:ला स्वतंत्र मणिपूर राष्ट्राचा प्रमुख म्हणून घोषित केले आहे. तर समरजित यांची नियुक्ती त्यांनी मणिपूर ‘राष्ट्रा’चे परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण मंत्री म्हणून केली आहे. या दोन्ही नेत्यांच्या पाच निवास्थानांवर इंफाळमध्ये धाडी पडल्या आहेत. या दोघांवरही मनी लाँडरिंग आणि हिंसाचाराचे गंभीर आरोप आहेत.
भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने (एनआयए) या दोघांच्या विरोधात आरोपपत्र सादर केले आहे. त्यांच्यावर सीबीआयनेही अनेक गुन्हे नोंदविले आहेत. या दोघांनी सालाई नामक एक वित्तसंस्थाही स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक घोटाळे केले जात असून मनी लाँडरिंगही केले जात आहे, असा आरोप ईडीने केला आहे. तसेच या दोघांनीही त्यांच्या फुटीरतावादी हालचाली चालविण्यासाठी सर्वसामान्य माणसांकडून खंडणीच्या मार्गाने पैसा गोळा केला असल्याचा आरोपही सीबीआयकडून सादर करण्यात आला आहे.
अनेकांची फसवणूक
वित्तीय संस्था स्थापन करुन त्यांनी मणिपूरमधील अनेकांना गंडा घातला आहे. लोकांना धमक्या देऊन त्यांनी 55 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली आहे, असा ईडीचा आरोप आहे. त्यांनी इतरही अनेक वित्तीय संस्था स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये विदेशी पाठविले आहेत, असा आरोप असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. सध्या त्यांच्या वित्तसंस्थांना टाळे लावण्यात आले असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची छाननी ईडीकडून केली जात आहे. मणिपूर स्टेट कौन्सिल ही त्यांची संघटनाही केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या निरीक्षणात असून या संघटनेवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारातही या संघटनेचा सहभाग होता, हे स्पष्ट झाले आहे.
मणिपूरचे ‘स्वातंत्र्य’ घोषित
या दोन फुटीरतावाद्यांनी 2019 मध्ये लंडन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी मणिपूर हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले होते. त्याच परिषदेत बिरेन यांनी स्वत:ला या नव्या राष्ट्राचा प्रमुख म्हणून घोषित केले होते, तसेच समरजित यांनी संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली होते. तथापि, त्यांचे देश फोडण्याचे प्रयत्न भारताकडून हाणून पाडण्यात आले.