Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा
esakal December 19, 2025 06:45 AM

नवी दिल्ली - ‘एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी सुचवण्याआधी भाजपने अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव सुचवले होते. त्याचप्रमाणे लालकृष्ण अडवानी यांच्याकडे पंतप्रधानपद देण्याचा सल्ला देण्यात आला होता.

मात्र, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हा सल्ला नाकारला होता,’ असा दावा अटलबिहारी वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार अशोक टंडन यांनी त्यांच्या ‘अटल संस्मरण’ या पुस्तकात केला आहे. टंडन यांनी १९९८ ते २००४ या कालावधीत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहिले होते.

‘तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हा सल्ला फेटाळला. बहुमत लाभलेल्या पंतप्रधानाने अशापद्धतीने राष्ट्रपतिपद स्वीकारल्यास, हा एक चुकीचा पायंडा पडेल आणि हे भारतीय संसदीय लोकशाहीसाठी चांगले नाही,’ असे वाजपेयी यांचे म्हणणे असल्याचे टंडन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.

राष्ट्रपतीपदासाठी सर्वपक्षांची सहमती असवी म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांनाही चर्चेसाठी निमंत्रण दिले होते, असे टंडन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.

'मला आठवते, सोनिया गांधी, प्रणव मुखर्जी आणि डॉ. मनमोहन सिंग त्यांना(अटलबिहारी वाजपेयी यांना) भेटायला आले होते. त्या वेळी वाजपेयींनी अधिकृतरीत्या प्रथमच जाहीर केले की, राष्ट्रपती निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित केले आहे.

त्याक्षणी बैठकीत काही क्षण शांतता पसरली. त्यानंतर सोनिया गांधींनी मौन सोडत म्हणाल्या की, या निवडीने मी आश्चर्यचकित झाले असून या निर्णयाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही; मात्र आम्ही यावर चर्चा करून मग निर्णय जाहीर करू,’ असे टंडन यांनी लिहिले आहे.

अन्य बाजूंवरही प्रकाश

टंडन यांनी त्यांच्या पुस्तकात वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात घडलेल्या अनेक इतर घटनांचा तसेच विविध नेत्यांशी असलेल्या वाजपेयींच्या संबंधांचा उल्लेख करतात.

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी या जोडीविषयी टंडन यांनी लिहिले आहे की, काही धोरणात्मक मुद्द्यांवर त्याच्यात मतभेद असूनही, या दोन्ही नेत्यांमधील संबंध कधीही सार्वजनिकरीत्या ताणले गेले नाहीत. अडवानी नेहमी अटलजींचा उल्लेख ‘माझे नेते आणि प्रेरणास्रोत’ असा करत, तर वाजपेयी त्यांना ‘माझा निष्ठावान सहप्रवासी’ असे संबोधत.

‘अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांची ही जोडी भारतीय राजकारणातील सहकार्य आणि समतोल यांचे प्रतीक आहे. त्यांनी भाजप हा पक्ष आणि सरकार या दोघांनाही नवी दिशा दिली,’ असेही टंडन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.

संसद हल्ल्याचा उल्लेख

१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. त्या वेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या असलेल्या सोनिया गांधी आणि वाजपेयी यांच्यात दूरध्वनीवर संवाद झाला. हल्ल्याच्या वेळी वाजपेयी आपल्या निवासस्थानी होते आणि सहकाऱ्यांसह दूरदर्शनवरून सुरक्षा दलांची कारवाई पाहत होते.

टंडन लिहितात, ‘अचानक काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा अटलबिहारी वाजपेयी यांना दूरध्वनी आला. त्या म्हणाल्या, ‘मला तुमची काळजी वाटते, तुम्ही सुरक्षित आहात ना?’ यावर अटलजींनी उत्तर दिले, ‘सोनियाजी, मी सुरक्षित आहे; मला काळजी वाटत होती की तुम्ही संसद भवनात असाल, स्वतःची काळजी घ्या.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.