कोपरी पोलिसांचा रूट मार्च
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोपरी पोलिसांनी कंबर कसली आहे. गुरुवारी (ता. १८) कोपरी परिसरात भव्य ‘रूट मार्च’ काढत पोलिसांनी शक्तिप्रदर्शन केले. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणाऱ्यांना जरब बसवणे, हा या मार्चचा मुख्य उद्देश होता.
संवेदनशील भागांवर विशेष नजर ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार शहरात विविध ठिकाणी रूट मार्चचे आयोजन केले जात आहे. कोपरी पोलिस ठाण्यापासून सुरू झालेला हा संचलन मार्च ठाणेकरवाडी आणि शिवमंदिर परिसर, कोपरी भाजी मार्केट आणि कपडा मार्केट, हासिजा कॉर्नर, सिद्धार्थ नगर आणि शांतीनगर बारा बंगला परिसर हा मार्गक्रमण पूर्ण करून रूट मार्च पुन्हा कोपरी पोलिस ठाण्यात समाप्त झाला.
पोलिस ताफा आणि सतर्कता या रूट मार्चमध्ये ६ पोलिस अधिकारी आणि ३० पोलिस अंमलदार सहभागी झाले होते. पोलिसांची शिस्तबद्ध हालचाल आणि सतर्क नजर पाहून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला. दुसरीकडे, निवडणुकीच्या काळात अफवा पसरवणे, दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे किंवा कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा या माध्यमातून देण्यात आला. निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी कोपरी पोलिसांकडून यापुढेही अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येतील. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी केले आहे.