नवी मुंबईत फोडाफोडीचे राजकारण तापले
शिंदेसेनेला माजी नगरसेवकांना गळाला लावण्यात यश
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ ः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गळाला लावल्यानंतर नवी मुंबई शहरात फोडाफोडीच्या राजकारणात शिवसेनेची शिंदेसेना वरचढ ठरली आहे. गेल्या सहा महिन्यांत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षातील माजी नगरसेवकांना स्वतःकडे खेचण्यात शिंदेसेनेला मोठे यश मिळाले आहे. या प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीत शिंदेसेना मविआच्या तुलनेत मजबूत ठिकाणी पोहोचली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिंदेसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवावी, या दृष्टीने शिंदेसेनेतर्फे वेगात तयारी सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजप याआधी लहान भाऊ असला, तरी वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या माजी नगरसेवकांच्या ताकदीमुळे भाजप मोठा भाऊ झाला आहे. भाजपकडून वारंवार शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली जात नाही. वेगवेगळ्या पातळीवर महायुतीच्या या दोन्ही पक्षांच्या महत्त्वांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहकाटशहचे राजकारण सुरूच असते. महापालिका निवडणुकीत आपल्याकडील नगरसेवकांचा आकडा मोठा असावा, याकरिता शिंदेसेनेने फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली. गेल्या सहा महिन्यांत शिंदे गटात आतापर्यंत १८ माजी नगरसेवक दाखल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिंदेसेनेने थेट काँग्रेसचा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गळाला लावला. नव्याने जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या माजी नगरसेविका पूनम पाटील यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. नुकतेच ठाणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पाटील यांनी पतीसह शिंदेसेनेत प्रवेश केला. ऐरोलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वात मोठे निष्ठावान म्हणून प्रसिद्ध असणारे एम. के. मढवी या कुटुंबीयांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. मढवी यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाकडे ऐरोलीत एकाच दमात तीन माजी नगरसेवकांची ताकद मिळाली आहे. एम. के. मढवी, माजी नगरसेविका विनया मढवी आणि करण मढवी असे तीन जणांनी प्रवेश केला आहे. ऐरोलीतील आणखी एक नगरसेवक प्रवेश करणार होता; मात्र मातोश्रीचा ‘वरुण’ आल्यामुळे हा प्रवेश थांबल्याचे समजते आहे; परंतु आगामी काळात किती वेळ थांबवू शकतो, हे निश्चित नाही.
--------------------------------------
काँग्रेसचे माजी नगरसेवकांचे बळ संपले
काँग्रेसकडे माजी नगरसेवक एकही शिल्लक राहिलेला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे एकच माजी नगरसेवक शिल्लक राहिलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बहुतांश नगरसेवक आपल्याकडे ओढून घेतल्याने आता त्यापक्षांकडे स्वतःचे माजी नगरसेवकांची ताकद राहिलेली नाही.
-----------------------------------------
नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रवेश
काँग्रेस प्रदेशपातळीहून कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर केली जात नव्हती. स्थानिक पातळीवर गटतट असल्यामुळे काम करता येत नव्हते. पक्षासाठी आम्ही भरपूर केले आणि त्या बदल्यात पक्षाने आम्हाला बरेच दिले; परंतु आता नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिंदेसेनेतून निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसच्या माजी नगरसेविका पूनम पाटील यांनी सांगितले. तर मी माझ्या कुटुंबासाठी आणि वैयक्तिक कारणास्तव शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. प्रभागातील कार्यकर्ते आणि प्रभागाच्या विकासासाठी प्रवेश केला असून मातोश्रीचा सन्मान मनात कायम राहणार, असे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी सांगितले.