सोलापूरच्या जंगलात सापडला 2000 वर्षापूर्वीचा सर्वात मोठा चक्रव्यूह, थेट या साम्राज्याशी कनेक्शन; इतिहासाची उलथापालथ होणार ?
Tv9 Marathi December 20, 2025 07:45 PM

महाभारतातल्या चक्रव्यूहाबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. पण चक्रव्यूह प्रत्यक्षात कसा असतो, कशी असचे रचना, तो कसा दिसतो हे किती जणांना माहीत असेल. पण आता याच संदर्भातील एक बातमी समोर आली आहे, जी वाचकांपैकी अनेकांची उत्सुकता चाळवू शकते. सोलापूर जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार अचंबित झाले आहेत. बोरामणीच्या गवताळ प्रदेशात 15 वर्तुळे असलेला एक भव्य ‘चक्रव्यूह’ सापडला आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा भारतात आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहच नाही तर प्राचीन रोम आणि भारत यांच्यातील गाढ व्यापारी संबंधांचा जिवंत पुरावा देखील असल्याची चर्चा आहे.

वन्यजीव निरीक्षणादरम्यान लागला हा ‘दुर्मिळ’ शोध

मनोरंजक गोष्ट म्हणजे, ही रचना कोणत्याही उत्खननादरम्यान सापडलेली नाही, तर वन्यजीव निरीक्षणादरम्यान या संरचनेचा शोध लागला आहे. ‘नेचर कंझर्व्हेशन सर्कल’ (एक एनजीओ) ची एक टीम ही रामणी वनक्षेत्रात दुर्मिळ गोल्डफिंच आणि लांडग्यांच्या संख्येवर लक्ष ठेवून होती. पप्पू जमादार, नितिन अनवेकर, धनंजय काकड़े, भरत छेड़ा, आदित्य झिंगाडे आणि सचिन सावंत या टीमच्या सदस्यांना तिथे दगडांची एक वेगळीच , अनोख रचना आढळली. त्यानतंर त्यांनी या गोष्टीची माहिती ताबडतोब पुरातत्वशास्त्रज्ञ सचिन पाटील यांना दिली, त्यानंतरच या शोधाचे गांभीर्य समोर आलं.

असं काय खासं आहे त्या चक्रव्यूहात ?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजमधील तज्ज्ञांनी या जागेचा सखोल अभ्यास केला आहे. सामान्यतः भारतात कमी वर्तुळे असलेल्या चक्रव्यूह रचनाआढळतात, परंतु 15 वर्तुळे असलेली इतकी मोठी रचना पहिल्यांदाच सापडली आहे असं त्यांच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ही रचना इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकादरम्यान किंवा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची आहे असा तज्ञांचा विश्वास आहे. हे चक्रव्यूह लहान दगडांच्या तुकड्यांपासून बनलेलं असून ते जमिनीपासून सुमारे 1 ते 1.5 इंच उंचीवर मातीच्या थरावर आहे. त्याला बाहेरून मध्यभागी जाणारा एक निश्चित मार्ग आहे. या चक्रव्यूहाची रचना त्या काळातील रोमन क्रेट नाण्यांवर आढळणाऱ्या खुणांशी अगदी जुळते.

पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रतीक नव्हते. त्या काळात सोलापूर हे जागतिक व्यापाराचे एक प्रमुख केंद्र होते. तज्ञांच्या मते, रोमन व्यापाऱ्यांनी त्याचा वापर नेव्हिगेशनल मार्कर (Navigational Marker) म्हणून केला असावा. इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकादरम्यान, मसाले, रेशीम आणि नीळ हे भारतातून रोमला निर्यात केले जात होते आणि त्या बदल्यात रोमहून सोने आणि मौल्यवान दगड भारतात आणले जात होते. बोरामणी परिसर कदाचित या व्यापारी मार्गाचा एक महत्त्वाचा भाग असावा.

हजारो वर्षांपूर्वीही भारताचे व्यापारी जाळे किती विकसित आणि जागतिक होतं हे या शोधावरून सिद्ध होतं. सोलापूरचा बोरामणी परिसर त्या काळातील ‘जागतिक व्यापार मार्गा’वरील एक महत्त्वाचा थांबा होता. ही रचना केवळ कलाच नाही तर प्राचीन इंजिनिअरिंग आणि भूगोलाची समज याचेही एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.