महायुतीत जागावाटपाचा तिढा
esakal December 21, 2025 05:45 AM

महायुतीत जागावाटपाचा तिढा
वसई-विरार पालिकेसाठी आठवले गटाची तयारी
विरार, ता. २० (बातमीदार) ः लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्याची तयारी आहे. याच अनुषंगाने वसई-विरार पालिकेत १५ उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे.
भाजपला मिळालेल्या यशानंतर वसई-विरार महापालिका मिळवण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. या निवडणुकीत भाजपला काही जागा शिंदे गटासाठी सोडाव्या लागणार आहेत. अशा परिस्थितीत आरपीआय आठवले गटानेदेखील जागावाटपात पक्षाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. वसई-विरार परिसरातील दलित समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून, लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान ही मते काही प्रमाणात महायुतीकडे वळली होती. विशेषतः बोईसर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवाराला आठवले गटाच्या पाठिंब्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्यामुळे पालिका निवडणुकीत महायुतीने आठवले गटाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष ॲड. ईश्वर धुळे यांनी केली आहे.
--------------------------------
भूमिकेवर लक्ष
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी अनेक वेळा वसई-विरार शहराला भेटी दिल्या असून येथील राजकीय गणितांवर बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीकडून आरपीआय आठवले गटाला किती जागा दिल्या जातात, याची उत्सुकता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.