आता काही वेळातच नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 288 जागांचा आज फैसला होणार आहे. या निवडणुकीतून कुणाचं ग्राऊंड लेव्हलला नेटवर्क मजबूत आहे, हे स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. कुणाचा मुलगा निवडणूक लढतोय, कुणाची बायको, तर कुणाचा खास शिलेदार मैदानात उतरला आहे. त्यामुळे या नेत्यांनी आपल्या जवळच्या लोकांना निवडून आणण्यासाठी प्रचंड जोर लावला होता. मतदार त्यांच्या पदरात यश टाकतात की अपयश टाकतात हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत कोणत्या कोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागलीय त्याचाच घेतलेला हा आढावा….
रावल, पटेलांना टेन्शन…
धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, पिंपळनेर नगर परिषदेचा निकाल आज असून पालकमंत्री जयकुमार रावल यांची शिंदखेडात प्रतिष्ठापनाला लागली आहे. शिरपूर येथे माजी मंत्री आमदार अमरीश पटेल यांचे पुत्र चिंतन पटेल हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार आहे. त्यामुळे अमरीश पटेल यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. जिल्ह्यात तिन्ही ठिकाणी महायुतीमध्येच खरी लढत पाहायला मिळते आहे. त्यामुळे कोणाची सत्ता या नगर परिषदेवरही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वळसेपाटील आणि कोल्हे गड राखणार?
नगरपरिषद निवडणुकांच्या मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तब्बल 19 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या जागांवर कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले. या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिंदे, राणेंची प्रतिष्ठापणाला
कोकणातल्या 27 जागांसाठी थोड्याच वेळात मतमोजणी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 7, रायगड 10, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी 4 आणि ठाणे जिल्ह्यात 2 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, मंत्री नितेश राणे, मंत्री आदिती तटकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची या निवडणुकीत प्रतिष्ठापणाला लागली आहे. कोकणातली सत्ता केंद्र कुणाच्या हातात याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे.
गायकवाड की सपकाळ? कुणाचं वर्चस्व?
बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेसाठी आज मतमोजणी होणार आहे , आणि याची उत्कंठा शिगेला पोहचली असून सकाळी 10 वाजता अकराही नगरपरिषदेसाठी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी मतदान केंद्रावर तैनात असणार आहे. त्यात एसआरपी, सीआरपीच्या तुकड्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील ज्या महत्त्वाच्या तीन लढती आहेत, त्यामध्ये बुलढाणा, खामगाव आणि चिखली या तीन महत्त्वाच्या लढती असणार आहेत. यामध्ये सगळ्यात जी महत्त्वाची ती लढत आहे, ती बुलढाणा नगरपरिषदेची असणार आहे. बुलढाणा नगर परिषदेसाठी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे या तिघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप बोगस मतदान या सगळ्या गोष्टींचा विचार करता बुलढाणा नगरपरिषदेच्या मतमोजणीकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
कुचे की टोपे ? अंबडमध्ये आजच ठरणार
जालना जिल्ह्यातल्या अंबड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून देवयानी कुलकर्णी तर शरद पवार गटाकडून श्रद्धा चांगले निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजप आमदार नारायण कुचे आपला गड राखण्यात यशस्वी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर सत्ता खेचून आणण्यासाठी माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दानवे की काँग्रेस? कोण ठरणार वरचढ?
जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये भाजप, काँग्रेस, शरद पवार गट आणि अजित दादा गट अशी लढत आहे. सत्ता खेचून आणण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर मागच्या अनेक वर्षापासून निर्विवाद सत्ता असलेला गड काँग्रेसला राखता येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपकडून आशाताई माळी, काँग्रेसकडून प्रियंका देशमुख तर शरद पवार गटाकडून समरीन मिर्झा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
लोणीकर परतूर राखणार?
जालन्याच्या परतुरमध्ये तिरंगी लढत झाली असली तरी देखील भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी त्याचबरोबर ठाकरे गट युती या दोघांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रियंका राक्षे तर अजित पवार आणि ठाकरे गट युवतीकडून शांताबाई बाबुराव हिवाळे रिंगणात आहेl. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परतूरमध्ये सभा घेतली होती. शिवाय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे देखील परतुरमध्ये प्रचार सभेसाठी आले होते. त्यामुळे भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया या दोघांच्या प्रतिष्ठापणाला लागल्या आहेत. दरम्यान परतुरमध्ये भारतीय जनता पक्ष 10 जागा जिंकेल आणि नगराध्यक्ष ही आमचाच होईल असा ठाम विश्वास, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे.
नाथाभाऊ ते गुलाबराव… सर्वांच्या प्रतिष्ठा पणाला
जळगाव जिल्ह्यात 18 नगरपालिकांच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी 1 हजार 555 उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी 77 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण 27 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्यात एकूण 65.28 टक्के एवढे मतदान झाले असून 8 लाख 81 हजार 508 मतदारांपैकी 5 लाख 78 हजार 79 एवढ्या जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 590 एवढे टपाली मतपत्रिकाची संख्या असून त्यापासूनच मत मोजणीला सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
विखे आणि थोरातांचं काय होणार?
अहिल्यानगर जिल्ह्यात 12 पालिकांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, काळे, अमोल कोल्हे, तनपुरे, गडाख या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी 10 वाजता वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून कुणाच्या अंगावर विजयी गुलाल पडतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
सत्तार, भुमरे आणि…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगर परिषद आणि एका नगरपंचायतची मतमोजणी होणार आहे. पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद आणि फुलंब्री या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार, पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
कुणाचा लागणार निक्काल ?
वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषदेचे निकाल आज जाहीर होणार. वर्धा नगरपरिषदेकरिता जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. वर्ध्यात सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. वर्धा, देवळी, आर्वी, पुलगाव, सिंदी (रेल्वे) आणि हिंगणघाट येथे कोणाला कौल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
बोर्डीकर, मुंडे यांची प्रतिष्ठापणाला
आज परभणीत 7 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासहित रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. धनंजय मुंडे यांची बहीण उर्मिला केंद्रे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनैद दुर्राणी यांच्या भवितव्याचा काही वेळात होणार फैसला होणार आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व निकाल येण्याची शक्यता आहे. चार राऊंडमध्ये होणाऱ्या या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.
शहाजीबापूंचं काय होणार?
सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी थोड्या वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रतिनिधी हे मतमोजणी केंद्रावर येण्यास सुरुवात झाली असून पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लागला आहे. 11 मतमोजणी टेबलद्वारे 4 फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होणार असून साधारणपणे दुपारी 12 वाजेपर्यंत सांगोल्याचा निकाल पूर्णपणे हाती येणार आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. विशेष म्हणजे सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या होत्या. भाजपा विरुद्ध शिवसेना अशा लढ्यात सांगोल्याचा नगराध्यक्ष कोण होणार. याची चर्चा सर्वत्र आहे.