अंडर 19 वनडे आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीपर्यंत (U19 Asia Cup 2025 Final) अंजिक्य असलेल्या भारतीय संघाला फायनलमध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागला. भारताचं यासह आशिया चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. पाकिस्तानने या सामन्यात समीर मिन्हास याच्या 172 धावांच्या जोरावर 347 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे टीम इंडियाला 348 धावांचं अवघड असं आव्हान मिळालं. या विजयी धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली. भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानसमोर गुडघे टेकले. भारताचा डाव या विजयी धावांचा पाठलाग करताना 156 धावांवर आटोपला.
टीम इंडियाला हा सामना जिंकता आला नाही. मात्र या सामन्यात चाहत्यांना खेळाडूंमध्ये राडा पाहायला मिळाला. भारतीय फलंदाजांनी त्यांना विनाकारण डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदाजाला त्याची जागा दाखवून दिली. पाकिस्तानच्या अली रझा या गोलंदाजाने टीम इंडियाची ओपनिंग जोडी आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या दोघांना आऊट झाल्यानंतर डिवचलं. आयुष आणि वैभव दोघेही आऊट झाल्यानंतर काही बोलणार नाहीत, असं अलीला वाटलं असावं. मात्र दोघांनीही अलीला चांगलंच सुनावलं. आयुषने तर अलीला चांगलीच अद्दल घडवली. त्यामुळे अली पुन्हा या दोघांच्या वाटेला जाणार नाही. अलीने आयुष आणि वैभवसोबत नक्की काय केलं? त्यानंतर या भारतीय फलंदाजांनी त्याला कसं उत्तर दिलं? हे जाणून घेऊयात.
आयुष आणि वैभव या सलामी जोडीसमोर 348 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून देण्याचं आव्हान होतं. आयुष आणि वैभवने भारताला विस्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी 2.1 ओव्हरमध्ये 32 धावा जोडल्या. मात्र दुसऱ्याच बॉलवर आयुष म्हात्रे आऊट झाला. अलीने आयुषला 5 धावांवर आऊट केलं.
आयुषकडून जशास तसं उत्तर
आयुषला आऊट केल्यानंतर अली विकृत जल्लोष करत होता. अलीने आयुषकडे पाहून त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र अती झाल्यानंतर आयुषने काही पाऊलं मागे येत अलीची लाज काढली. आयुषला बॅटिंगने काही खास करता आलं नाही. मात्र आयुषने जाता जाता अलीला चांगलंच सुनावलं. आयुषने अलीला शिव्या दिल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. आयुष आणि अली या दोघांतील वादाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
वैभवनेही जागा दाखवली
इतकं होऊनही अलीची मस्ती कमी झाली नाही. अलीने आयुषनंतर वैभव सूर्यवंशी याला आऊट केलं. अलीने वैभवला पाचव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर आऊट केलं. त्यामुळे वैभवच्या 26 धावांच्या खेळीचा शेवट झाला. अलीने वैभवला डिवचण्याचा प्रयत्न केला. वैभवने यावर तोंडाने काही उत्तर दिलं नाही. मात्र वैभवने हाताद्वारे त्याच्या बुटांकडे इशारा केला आणि मैदानाबाहेर निघून गेला. अशाप्रकारे वैभवनेही काही न बोलता अलीला सुनावलं.