नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 9 शुभ योग, कोणत्या मुहूर्तावर पूजा कराल?
Tv9 Marathi December 22, 2025 12:45 AM

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने २०२६ या वर्षातील पहिला दिवस म्हणजे १ जानेवारी २०२६ हा दिवस अत्यंत खास ठरणार आहे. या दिवशी ग्रहांची अशी काही दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे, जी आध्यात्मिक प्रगती आणि नवीन कार्यांच्या सुरुवातीसाठी अत्यंत फलदायी मानली जात आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ शुभ संयोगांचा दुर्मिळ योग जुळून येत आहे.

शिव आणि विष्णूच्या आशीर्वादाचा संगम

२०२६ च्या पहिल्याच दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांच्या पूजेचा दुर्मिळ योग आहे. हा दिवस गुरुवारी येत असल्याने तो श्रीविष्णूंना समर्पित आहे, तर तिथीनुसार या दिवशी गुरु प्रदोष व्रत असल्याने तो शिवपूजेसाठीही अत्यंत शुभ आहे. वर्षभर सुख, शांती आणि समृद्धी लाभण्यासाठी या दिवशी दोन्ही देवतांची उपासना करणे लाभदायक ठरेल.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शुभ संकल्प सोडण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी अनेक अनुकूल काळ उपलब्ध आहेत. यामध्ये सकाळी ०५:२५ ते ०६:१९ या वेळेत ब्रह्म मुहूर्त असेल. तर सकाळी ०७:५७ ते ०९:२३ पर्यंत अमृत काळ राहील. दुपारी १२:०४ ते १२:४५ या वेळीत अभिजीत मुहूर्त असून दुपारी ०२:०८ ते ०२:५० या वेळेत ‘विजय मुहूर्त’ असेल, जो नवीन सुरुवातीसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

तिथी आणि नक्षत्रांचे विशेष महत्त्व

१ जानेवारीला पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्र असून ते रात्री १०:४८ पर्यंत राहील. रोहिणी नक्षत्र हे आनंद, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर मृगशिरा नक्षत्र सुरू होईल. याशिवाय, सायंकाळी ०५:१२ पर्यंत शुभ योग आणि त्यानंतर शुक्ल योग असेल. हे दोन्ही योग करिअरमधील प्रगती, नवीन नोकरी किंवा विवाहासारख्या शुभ कार्यांसाठी अत्यंत अनुकूल आहेत. रात्री १०:४८ पासून रवि योग देखील सुरू होत आहे, जो कुंडलीतील दोष दूर करण्यास मदत करेल.

रुद्राभिषेकासाठी सुवर्णसंधी

शिवभक्तांसाठी हा दिवस पर्वणीच आहे. या दिवशी ‘शिववास’ नंदीवर असून तो रात्री १०:२२ पर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रात नंदीवरील शिववास हा रुद्राभिषेकासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात केलेली शिवपूजा आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांती प्रदान करणारी ठरेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.