Tasgaon Municipal Election : तासगाववर संजय पाटील यांची पकड कायम; १३–११ च्या निकालाने 'अजून मैदानात आहोत'चा ठाम संदेश
esakal December 22, 2025 10:45 PM

तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवत माजी खासदार संजय पाटील यांनी ‘आपण अजून मैदानात आहोत,’ हे दाखवून दिले. या निवडणुकीनिमित्त आमदार रोहित पाटील यांच्या अपरिपक्व राजकारणाचे दर्शन घडले, तर तासगाव शहरावर पकड कायम असल्याचे माजी खासदार पाटील यांनी दाखवून दिले.

तासगाव पालिकेची ही निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजली. शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारणार हे समजू शकत नव्हते. मात्र माजी खासदार संजय पाटील यांनी १३ विरुद्ध ११ असा डाव जिंकला. आमदार रोहित पाटील यांना झटका दिला. गेल्या निवडणुकीतही १३ विरुद्ध ८ अशीच पालिका जिंकली होती.

Sangli Election Result : अखेर ९९ मतांनी फैसला! तासगावमध्ये विजया पाटील यांचा थरारक विजय

लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवाने ‘बॅकफूट’वर गेलेल्या संजय पाटील गटाला या निवडणुकीने संजीवनी मिळाली, असेच मानावे लागेल. या निवडणुकीत संजय पाटील यांनी रणनीती पूर्णपणे बदलली होती. नेहमीची आक्रमकता दिसत नव्हती. कोणतीही कसलीही प्रतिक्रिया नव्हती. किंबहुना यामुळेच विरोधक गोंधळल्याचे चित्र दिसले.

निवडणूक सुरुवातीला पूर्णपणे आमदार रोहित पाटील यांच्याकडे झुकली होती. मात्र रोहित पाटील यांनी पारंपरिक मार्ग बदलला. विधानसभेला तासगाव शहरातून मताधिक्य मिळाल्याने पालिका सहज ताब्यात घेणार असे चित्र होते.

Sangli Election : ईश्वरपूरमध्ये पुन्हा जयंतरावांचे ‘कारभारी’; पालिकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाची सरशी

किंबहुना राष्ट्रवादीकडे पालिका जाणार असे दिसत असताना उमेदवार निवडीत त्यांनी केलेल्या चुका विरोधकांच्या पथ्यावर पडल्या. अनुभव, उत्साह याचा मेळ राजकारणात असणे गरजेचे असते. मात्र तेथेच घोडे अडले.

आर. आर. आबांचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय पाटील दुखावले. त्यांची समजूत काढण्याऐवजी त्यांना मोडीत काढण्याच्या प्रयत्नात अवघ्या ९९ मतांत सत्ता गेली. राजकारणात अनुभव महत्त्वाचा असतो, याचे शब्दशः प्रत्यंतर यानिमित्ताने आले.

भाजपने बेंडकुळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला. ते आव्हान उभे करतील, असे वाटत असताना भाजप संजय पाटील यांच्यामागे वाहत गेल्याचे दिसले. संपूर्ण निवडणूक दोन गटाभोवती, बंडखोर उमेदवारांभोवती फिरत राहिली. पैशाचा अभूतपूर्व वापर झाला.

त्याचा परिणाम खाली पॅनेलवर झालेला दिसला. नगराध्यक्षपदाभोवतीच निवडणूक लढली गेली. आमच्यावर केले गेलेल्या आरोपांना मतदारांनी परस्पर उत्तर दिले आहे.जनतेने मतांच्या माध्यमातून मला दिलेला कौल मी कामांच्या माध्यमातून सिध्द करेन. आमचे नेते संजयकाका पाटील माध्यमातून विकासकामांसाठी प्रयत्न करेन. तासगावचे रुपडे पालटण्याचा आमचे ध्येय आहे.

-विजया बाबासो पाटील, नगराध्यक्षा, तासगाव पक्षीय बलाबल

शहर स्वाभिमानी विकास आघाडी - १३

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष - ११ तासगाव नगरपालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.