Mohan Bhagwat : लिव्ह इन रिलेशनशिपवर RSS प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य
Tv9 Marathi December 22, 2025 10:46 PM

भारतीय समाज व्यवस्थेतील कुटुंबाच्या रचनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. पश्चिम बंगाल कोलकत्ता येथे एका RSS च्या कार्यक्रमात ते बोलत होते. लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणारे लोक जबाबदारी घेण्यासाठी तयार नाहीत, असं ते म्हणाले. “लिव्ह इन रिलेशनशिपची कॉन्सेप्ट सर्वांसमोर आहे. यात तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. हे योग्य नाही” असं मोहन भागवत म्हणाले. “कुटुंब, लग्न हे फक्त शारिरक समाधानाचं माध्यम नाहीय, हा एक समाजाचा एक भाग आहे. कुटुंब अशी एक जागा आहे, जिथे कुठलाही व्यक्ती समाजात राहणं शिकतो. लोकांना मूल्य तिथूनच मिळतात” असं मोहन भागवत म्हणाले.

“कुटुंब हे एक संस्कृती आणि अर्थव्यवस्थेच संगम आहे. काही मूल्य स्वीकारुन तुम्ही समाजाला आकार देतात. आपल्या आर्थिक गोष्टी सुद्धा कुटुंबाच्या माध्यमातून होतात. बचत,सोनं हे कुटुंबांमध्ये आहे, सांस्कृतिक विभाग, आर्थिक विभाग आणि सामाजिक विभाग कुटुंबामध्ये आहे. लग्न करायचं नसेल, तर सन्यासी बना, चालेल” असं मोहन भागवत म्हणाले.

किती मुलं आदर्श?

कुटुंब व्यवस्थेबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “मुलांची संख्या ठरवणं किंवा लग्नाचं वय ठरवण्याचा कुठलाही फॉर्म्युला नाही. पण रिसर्चवरुन असं लक्षात आलय की, तीन मुलं आदर्श ठरु शकतात. लग्न 19 ते 25 वयोगटात होऊ शकतं”

तीन मुलं झाल्यास लोक ईगो मॅनेजमेंट शिकतात

“किती मुलं झाली पाहिजेत, हे कुटुंबामध्ये ठरतं. याचा कुठला फॉर्म्युला नाहीय. मी डॉक्टरांशी बोलून काही माहिती मिळवलीय, त्यानुसार लग्न लवकर खासकरुन 19 ते 25 वयोगटात झालं. तीन मुलं झाली, तर आई-वडिल आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहतं. मानसोपचारतज्ज्ञांनुसार, तीन मुलं झाल्यास लोक ईगो मॅनेजमेंट शिकतात” असं मोहन भागवत म्हणाले.

लोकसंख्या एक ओझं आहे

“लोकसंख्या एक ओझं आहे. पण ही एक संपत्ती सुद्धा आहे. आपल्याला पर्यावरण, इंफ्रास्ट्रक्चर, सुविधा, महिलांची स्थिती, त्यांचं आरोग्य आणि देशाच्या आवश्यकता लक्षात घेऊन पुढच्या 50 वर्षांचा विचार करुन एक पॉलिसी बनवली पाहिजे” असं मोहन भागवत म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.