Beed Election : तरुणाईच्या हाती सत्तेची धुरा; अवघ्या २२ व्या वर्षी डॉ. आकांक्षा फावडे नगरसेवक!
esakal December 23, 2025 05:45 AM

ईश्वर खामकर

किल्लेधारूर (बीड) : धारूर नगरपरिषदेची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दमदार कामगिरी करत अध्यक्षपदासह २० पैकी ११ नगरसेवकांच्या जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे धारूर नगरपरिषदेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती गेल्या आहेत.

या निवडणुकीत शहरातील पेठ विभागातील प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. आकांक्षा फावडे यांनी विजय मिळवून विशेष लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या २२ व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी धारूर नगरपरिषदेतील सर्वात तरुण नगरसेवक होण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे शहराच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.डॉ. आकांक्षा पावडे या उच्चशिक्षित असून सामाजिक जाणीव आणि विकासात्मक दृष्टीकोनाच्या बळावर त्यांनी निवडणूक प्रचार केला. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी नागरी समस्यांवर भर दिला.

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, महिला व युवकांचे प्रश्न यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती, ज्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.त्यांच्या विजयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. तसेच डॉ. आकांक्षा पावडे यांच्या रूपाने नगरपरिषदेच्या कारभारात नवे विचार, ऊर्जा आणि तरुणाईचा आवाज पोहोचेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.