Pune: अस्सल ग्रामसंस्कृतीचा 'भीमथडी' उत्सव; अस्सल गावरान चव आणि लोककलेला पुणेकरांची पसंती
esakal December 23, 2025 05:45 AM

पुणे : गावरान संस्कृतीचा रंग, लोककलेची झलक आणि अस्सल ग्रामीण चवीचा आस्वाद घेण्यासाठी रविवारी (ता. २१) पुणेकरांनी भीमथडी जत्रेत मोठ्या संख्येने हजेरी लावली. कुठं चुलीवरच्या भाकरीचा दरवळणारा सुवास, तर कुठं नंदीबैल-वासुदेवाच्या स्वरांनी जिवंत झालेली लोककला पुणेकरांनी यावेळी अनुभवली. हस्तकला, लोककला आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांनी सजलेल्या भीमथडी जत्रेला उदंड प्रतिसाद लाभला.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने भीमथडी जत्रेचे आयोजन केले आहे. ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या जत्रेत काळानुरूप लोप पावत चाललेल्या कला, संस्कृती आणि परंपरा पुन्हा एकदा अनुभवता येत आहेत. बारा बलुतेदार पद्धतीचे दर्शन घडवणारी अनोखी रांगोळी, भोला नंदीबैलाचे सादरीकरण, तसेच देशातील विविध राज्यांचे स्टॉल्स जत्रेचे विशेष आकर्षण ठरत आहेत.

भरडधान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचे मिलेट कॅफे, शेतकरी गटांचे फार्मर्स मार्केट, मध, सेंद्रिय बियाणे, बियाणे बँक आणि कृषी विद्या केंद्रांच्या स्टॉल्सवर नागरिकांची मोठी गर्दी केली होती. ही जत्रा २५ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत खुली असून, जत्रेबाहेरही गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात आल्याने संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे.

भारतीय कला, खाद्यसंस्कृती महोत्सव

भारतीय चित्रशैलीचे दर्शन घडविणाऱ्या गोंद, पट्टचित्र, फड आणि पिचवाई या चित्रशैलींमधील कलाकृती यावेळी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच बचत गटांनी सादर केलेली हस्तकला, मातीची भांडी, चटण्या, मसाले, लोणची, मुरांबे, प्रीमिक्स मिलेट चिवडा आणि विविध प्रकारचे कपडे खरेदीसाठी उपलब्ध असून, महिलांची या स्टॉल्सकडे विशेष पसंती दिसून येत आहे.

Hiralal Kashidas Bhajiawala : जिभेवर रेंगाळणारी सुरती चव

खवय्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी अशा विविध पदार्थांची रेलचेल असून, ज्वारीचा हुरडा, सेंद्रिय गूळ, लाकडी घाण्याचे तेल, देशी बियाणे, फळबागांची रोपे आणि भाजीपाला रोपांना मागणी आहे. विविध राज्यांची ओळख असलेल्या साड्यांच्या स्टॉल्ससमोर महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.