Cricket Retirement: ३९० हून अधिक विकेट्स अन् २७०० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा! १४ वर्षांनंतर केलं अलविदा
esakal December 23, 2025 11:45 AM
  • भारतीय अष्टपैलू कृष्णप्पा गौतमने निवृत्तीची घोषणा केली आहे.

  • गौतमने ३९४ विकेट्स आणि २७८३ धावा केल्या.

  • त्याने कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे आभार मानले, तसेच आयपीएलमधील विविध संघांचेही आभार व्यक्त केले.

यंदाच्या वर्षी अनेक भारतीय खेळाडूंनी निवृत्तीचे निर्णय घेतले. कोणी केवळ एकाच प्रकारातून, तर कोणी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. आता यात आणखी एक ना सामील झाले आहे. यंदाचं वर्ष संपवण्यासाठी आता साधारण आठच दिवस उरले असताना भारताचा ३७ वर्षीय अष्टपैलू कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) याने स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने १४ वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा केले आहे.

सोमवारी बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याने निवृत्तीची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्याचे कुटुंबियही हजर होते. तसेच कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष वेंकटेश प्रसाद, सचिव संतोष मेनन आणि उपाध्यक्ष सुजित सोमसुंदर हे देखील उपस्थित होते.

Cricketer Retirement: दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या दिग्गज अष्टपैलू क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा, गौतम गंभीरनेही दिली प्रतिक्रिया

गौतमने निवृत्तीची घोषणा करताना म्हटले की 'मला तुम्हाला हे सांगायचे आहे की मी प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या देशाचे आणि कर्नाटकचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा आनंद आणि सन्मानाची गोष्ट होती.'

'मी पुनरागमन करणारा खेळाडू राहिलो आहे, अनेकदा मी कारकिर्दीत पुनरागमन केले. तथापि, जरी मी कर्नाटक संघात परत येण्याचा प्रयत्न केला, तरी ते युवा खेळाडूंवर अन्याय असेल. ते या खेळाचे भविष्य आहेत.'

'माझ्यासाठी दुसऱ्या राज्यसंघाकडून खेळण्याचा पर्याय होता. पण मी कधीही त्याचा गांभीर्याने विचार केला नाही. मी कर्नाटकचा खेळाडू म्हणून हा प्रवास सुरू केला होता आणि मला तसंच लक्षात ठेवलं जावं, असं वाटलं. दुसऱ्या संघाकडून खेळण्याचा विचार फार क्विचित माझ्या मनात आला, पण माझ्या मनात असा विचार कधीही नव्हता.'

तो पुढे म्हणाला, 'माझ्या कारकिर्दीच्या या अध्यायाचा शेवट केवळ या आयकॉनिक मैदानात- एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होऊ शकतो,असं वाटलं. इथे माझ्या स्वप्नांनी आकार घेतला. मी इथे प्रेक्षक, बॉलबॉय आणि मैदानात खेळाडू म्हणून खेळण्यासाठी उतरलो. मी सुदैवी आहे की मी ते स्वप्न जगू शकलो आणि विविध संघांसाठी सामने जिंकू शकलो.'

गौतमने बीसीसीआय आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचेही आभार मानले. तसेच त्याने आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांचेही आभार मानले. तसेच त्याने प्रशिक्षक , निवड समिती, संघसहकारी, कर्णधारांबद्दलही कृतज्ञता व्यत्त केली.

View this post on Instagram