विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ची सुरुवात 24 डिसेंबरपासून होणार आहे. विराट कोहली या स्पर्धेत दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसणार होता आणि याच कारणामुळे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने दिल्लीचे काही सामने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हलवले होते. विराटला पुन्हा एकदा चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. मात्र, आता कोहलीच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. कोहली आता चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना दिसणार नाहीये
‘किंग कोहली’ आयपीएलमध्ये आरसीबी (RCB) कडून खेळतो आणि हे स्टेडियम या संघाचे होमग्राउंड आहे. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीच्या विजयानंतर झालेल्या जल्लोषादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. याच कारणामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर सध्या कोणतेही सामने होत नाहीत. मात्र, सुरक्षेची योग्य काळजी घेतली गेली, तर चिन्नास्वामीवर सामने आयोजित केले जाऊ शकतात, अशी परवानगी कर्नाटक सरकारने ‘केएससीए’ला (KSCA) दिली होती.
विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतल्यावर, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने (KSCA) अलूर येथे होणारे दिल्लीचे सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर हलवले होते. काही काळापूर्वी अशी बातमी समोर आली होती की, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चाहत्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. आता ‘क्रिकबज’ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कर्नाटक सरकारच्या आदेशानंतर चिन्नास्वामी येथे होणारे सामने आता बंगळुरू येथील BCCI CoE (Center of Excellence) मध्ये हलवण्यात आले आहेत. KSCA ला मंगळवारी सकाळी या निर्णयाची माहिती देण्यात आली आणि त्यांनी तातडीने संबंधित संघांना सामने हलवल्याबद्दल कळवले आहे. अशा परिस्थितीत, कोहलीचा जलवा आता चिन्नास्वामी स्टेडियमवर चाहत्यांना पाहता येणार नाही.
विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये दोन सामने खेळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांचा भाग असेल. कोहली 24 डिसेंबरला आंध्र प्रदेशविरुद्ध खेळणार असून, दिल्लीचे प्रशिक्षक सरनदीप सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय, कोहली 26 डिसेंबरला गुजरातविरुद्ध खेळताना दिसू शकतो. विशेष म्हणजे, हे दोन्ही सामने आता चिन्नास्वामी स्टेडियमऐवजी BCCI CoE मध्ये हलवण्यात आले आहेत.