चांदीच्या तुलनेत सोने आणि शेअर मार्केटही मागे, वर्षभरात गुंतवणुकदरांना नेमका किती मिळाला फायदा
Marathi December 24, 2025 12:26 AM

चांदीचा दर: दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. चांदीने दराचे सर्व विक्रम मोडित काढले आहेत. जागतिक अनिश्चितता, सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी आणि औद्योगिक वापरात वाढ यामुळं चांदीने या वर्षी केवळ सोन्यालाच नव्हे तर शेअर बाजारालाही परतावा देण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. या वर्षी आतापर्यंत सोन्याने अंदाजे 70 ते 72 टक्के परतावा दिला आहे, तर चांदीच्या किमतीत 130 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

चांदीच्या तेजाच्या तुलनेत सोने फिके पडले आहे

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, दिल्लीत चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 2 लाख 14 हजार 500 या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. जो वर्षाच्या सुरुवातीला प्रति किलोग्रॅम 90 हजार 500 होता. याचा अर्थ असा की एका वर्षाच्या आत, चांदी सुमारे 1 लाख 24 हजार रुपयांनी महागली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की ही वाढ केवळ अनुमानांमुळे नाही तर मजबूत मूलभूत कारणांमुळे आहे.

वाढत्या औद्योगिक मागणीमुळं चांदीच्या किंमतीत वाढ

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात आणखी कपात होण्याची अपेक्षा आहे. सरकारी रोखे आणि चलनांपेक्षा पर्यायी गुंतवणुकीकडे वळणे, जागतिक चांदीच्या पुरवठ्यातील सलग पाचव्या वर्षी कमतरता आणि इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या उदयोन्मुख उद्योगांकडून वाढती औद्योगिक मागणी यामुळे चांदीच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय, ईटीएफमधील गुंतवणूक, भौतिक चांदी खरेदी आणि सोने-चांदीच्या गुणोत्तरात घट दर्शवते की गुंतवणूकदार आता चांदीकडे एक आशादायक संधी म्हणून पाहत आहेत.

पुढील वर्षी 20 टक्क्यां पर्यंत वाढ

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की पुढच्या वर्षी चांदीच्या किंमतीत असा अपवादात्मक परतावा मिळण्याची शक्यता कमी असली तरी, मागणी वाढल्यामुळे आणि मर्यादित पुरवठ्यामुळे 2026 मध्ये आणखी 15 टक्के ते 20 टक्के वाढ शक्य आहे. गुंतवणूकदारांना अस्थिरता लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी व्यावसायिक आर्थिक सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करणं कठीण होत आहे. सर्वसामान्य लोक सोन्या चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. मात्र, काही लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहे. दरम्यान, सोन्यापेक्षा चांदीच्या दरानं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा धाला आहे.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.