12860
आचरा ः परिचय लेख स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसमवेत मान्यवर.
‘कोमसाप’मुळे लिहित्या हातांना उभारी
सुरेश गावकर ः आचऱ्यात परिचय लेख स्पर्धेचे बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २३ ः मालवण ‘कोमसाप’ने सहा वर्षांत उत्तुंग साहित्यिक कार्य केले आहे. उदयोन्मुख साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित करून लिहित्या हातांना उभारी दिली आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ ‘कोमसाप’ कार्यकर्ते सुरेश गावकर यांनी केले. येथील केंद्रशाळेत आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणने अलीकडेच ‘कोमसाप’चे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘करूळचा मुलगा’ या आत्मचरित्रावर आधारित परिचय लेख स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ श्री. गावकर यांच्या अध्यक्षतेखाली बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे क्र.१ येथे झाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक रसिका तेंडोलकर (कसाल) यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक वंदना राणे (कणकवली), तृतीय रश्मी आंगणे (ओसरगाव), उत्तेजनार्थ श्रद्धा वाळके (मसुरे), महादेव बागडे (आचरा), मोहन गावकर (कोल्हापूर), मधुरा माणगावकर (कणकवली), उज्ज्वला धानजी (कणकवली), चंद्रशेखर धानजी (कणकवली), शरयू घाडी (मुणगे-देवगड) यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण सुधाकर वळंजू (पणदूर) यांनी केले.
ही स्पर्धा कोमसाप मालवणच्या कार्यकर्त्या सुजाता टिकले (कणकवली) यांनी आपल्या दिवंगत मातोश्री (कै.) विजया भास्कर वालावलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेली होती. सहभागी स्पर्धकांना अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा ‘रानवाटा’ हा ग्रंथ प्रदान केला. विजेत्यांना रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांचा ‘स्मृतिजागर’ हा ग्रंथ भेट म्हणून दिला. व्यासपीठावर कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, सुधाकर वळंजू, अशोक कांबळी, सदानंद कांबळी, स्नेहा नारिंगणेकर, कुमार कांबळे, माधव गावकर आदी उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. ठाकूर यांनी, मधुभाई यांनी आपल्या कोकणच्या लाल मातीतील साहित्यिकांसाठी ‘कोमसाप’ निर्माण केली. हे फार मोठे कार्य केले आहे, असे सांगितले. यावेळी ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो, कवयित्री सुनंदा कांबळे, द. शि. हिर्लेकर, बाबाजी भिसळे, प्रकाश पेडणेकर, मंदार सांबारी आदी उपस्थित होते.