PCMC Election : शरद पवारांना मोठा दणका, भाजपने बडा नेता फोडला, राजकीय समीकरण बदलणार
Tv9 Marathi December 24, 2025 08:45 AM

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीती घोषणा झालेली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत. तसेच या काळात पक्षांतरालाही वेग आला आहे. अनेक नेते आपापल्या सोयीनुसार पक्ष बदलताना दिसत आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे. हा नेता कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांना मोठा धक्का

पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे उमेदवार, माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, आदरणीय मोदीजी व आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टी हा एकमेव पारदर्शक, विकासाभिमुख व लोककल्याणकारी पक्ष आहे. त्यामुळेच भाजपा परिवाराला असलेले जनसमर्थन सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच समाजहिताची तळमळ असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला भाजपा परिवारात सामील व्हायचे आहे. आज राहुल कलाटे यांनी पक्षात प्रवेश केला.

छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजपात इनकमिंग

पिंपरी-चिंचवड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजपात इनकमिंग झाली आहे. उबाठा गटाचे माजी नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रेणुकदास उर्फ राजू वैद्य आणि छत्रपती संभाजीनगरचे उबाठाचे विधानसभा संघटक अक्षय खेडकर यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. यावेळी मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आ. संजय केनेकर, छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे हे मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, आता या पक्षप्रवेशाचा परिणाम आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.