Vijay Hazare Trophy: भारताचा सर्वात तरुण आणि स्फोटक 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने विजय हजारे ट्रॉफीत तुफान आणलं आहे. अरुणाचल प्रदेश संघाविरोधातील रांची येथील मैदानावरील सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीने 84 चेंडूवर 190 धावा चोपल्या. वैभव सूर्यवंशीने त्याच्या डावात आतापर्यंत 226.19 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 16 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने धावांचा डोंगर उभा केला. त्याच्या दमदार फटकेबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याच्यासमोर गोलंदाजांना नुसता घाम गाळावा लागला. बिहारच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद खेळी करत अरुणाचल प्रदेश संघाचा सूर्य अस्त केला. या संघाच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली.
List-A मधील सर्वात वेगवान शतक
वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरोधात केवळ 36 चेंडूत शतक ठोकले. ए यादीत, एखाद्या भारतीय खेळाडूने ठोकलेले हे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. ए संघात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम पंजाब संघाचा अनमोलप्रित सिंह याच्या नावावर आहे. त्याने 2024 मध्ये अरुणाचल प्रदेशविरोधात 35 चेंडूत शतक ठोकले होते. तर अवघ्या एक चेंडू शिल्लक खेळत अरुणाचल प्रदेश संघाविरोधातच वैभव सूर्यवंशी याने शतक ठोकले. ए यादीत सर्वाधिक वेगवान शतक ठोकण्याचा जागतिक विक्रम ऑस्ट्रेलियाचा जेक फ्रेजर-मॅक्गर्क याच्या नावे आहे. त्याने 2023-24 च्या हंगामात दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी तस्मानियाविरोधात केवळ
29 चेंडूत शतक ठोकले आहे.
आता टीम इंडियात आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळवा
वैभव सूर्यवंशी सातत्याने दमदार खेळी खेळत आला आहे. त्याने गेल्या एका वर्षात स्फोटक फलंदाजी केली आहे. त्याने अनेकदा षटकार-चौकारांची सलामी दिली आहे. त्याच्या चेंडूला सीमा रेषे पार जाण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांना जशी कमी वयात आंतरराष्ट्रीय सामन्यात उमेदवारी देण्यात आली. तशीच संधी वैभव सूर्यवंशीला देण्याची मागणी होत आहे. जर त्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळला तर कुणालाही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. वैभव सूर्यवंशी हा डावखूरा स्फोटा फलंदाज म्हणून ओळखल्या जातो.इतकेच नाही तर तो डाव्या हाताने चेंडू लिलया फेकतो. तो डावखूरा फिरकी पटू आहे.
35 चेंडूत IPL मध्ये शतक
वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 14 व्या वर्षी IPL मध्ये कसाईनुमा फलंदाजी केली होती. 28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्सविरोधातील IPL सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ 35 चेंडूत शतक ठोकले होते. वैभव सूर्यवंशीने IPL च्या इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकले. राजस्थान रॉयल्स संघाने वैभव सूर्यवंशी याला IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये 1.10 कोटी रुपयांना खरेदी केली होते. वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमधील आतापर्यंतचा सर्वात कमी वयाचा फलंदाज आहे.