रोहित-विराटनंतर आता जसप्रीत बुमराह विजय हजारे ट्रॉफीत खेळणार का? समोर आली अशी माहिती
GH News December 25, 2025 12:11 AM

विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत दिग्गज खेळाडू खेळत आहेत. पहिल्या टप्प्यातील सामन्यात दिग्गज खेळाडूंनी धावांचा पाऊस पाडला. विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खेळताना पाहून क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे. दोघांनी शतकी खेळी केल्याने आनंदाला पारावर उरला नाही. ऋषभ पंत दिल्लीकडून, शुबमन गिल पंजाब संघात आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमराह या स्पर्धेत खेळणार का? असा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराह देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरात संघाकडून खेळतोच. आता गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, बुमराह विजय हजारे ट्रॉफीत संघाचा भाग नसेल. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, बुमराहला आराम देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीत गुजरात संघात जसप्रीत बुमराहला स्थान नाही.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत जसप्रीत बुमराह खेळला होता. आता त्याची निवड न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 संघात त्याची निवड केली आहे. त्यामुळे 21 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेत जसप्रीत बुमराह खेळताना दिसेल. त्यानंतर 8 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार आहे. त्यामुळे ही मालिका महत्त्वाची आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे त्याचं या संघात नाव नसेल. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर संघ थेट टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेतच जसप्रीत बुमराहचं कमबॅक होईल. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातचा संघ जसप्रीत बुमराहशिवायच खेळणार हे आता स्पष्ट झालं आहे.

गुजरात आणि सर्व्हिसेज यांच्यात विजय हजारे ट्रॉफीतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरातने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सर्व्हिसेजने 42.2 षटकात सर्व गडी गमवून 184 धावा केल्या आणि विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरातने 2 गडी गमवून 34.5 षटकात पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो अरझान नागवासवाला.. त्याने 8.2 षटकात 34 धावा देत 4 गडी बाद केले. इतकंच काय तर एक षटक निर्धाव टाकलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.