वडगाव मावळ, ता. २४ : पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उमेद अभियानांतर्गत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उमेद सावित्री दालन’ हे विक्री स्टॉल सुरू करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहायता गटातील महिलांना थेट देश-विदेशातील प्रवासींपर्यंत उत्पादनांची विक्री करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मावळातील बचत गटातील महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत महिला स्वयं सहाय्यता समूहांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य आदींची विक्री स्टॉलवर करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांना केवळ उत्पादने विकण्याचीच नव्हे तर विक्री प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची संधी देण्यात येत आहे. उमेदच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्या नेतृत्वाखाली ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असून, व्यापक बाजारपेठ मिळण्यास मदत होईल.
काही अडचणी अथवा मार्गदर्शनासाठी मावळ पंचायत समितीमधील तालुका अभियान व्यवस्थापन कक्षात संपर्क साधावा. या संधीसाठी इच्छुक महिलांनी नोंदणी संकेतस्थाळावर आपली माहिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे विमानतळावर ग्रामीण महिलांसाठी सुरू करण्यात आलेले विक्रीचे नवे ‘उमेद सावित्री दालन’ म्हणजे ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे टाकलेले पाऊल आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक चालना मिळणार आहे.
- कुलदीप प्रधान, गटविकास अधिकारी, मावळ पंचायत समिती.