महाराष्ट्रातील दोघीजणी, ज्यांनी राजस्थानात जाऊन मनुच्या पुतळ्याला काळं फासलं; तेव्हा नेमकं काय घडलं होतं?
BBC Marathi December 25, 2025 12:45 PM
BBC छत्रपती संभाजीनगर येथील कांताबाई अहिरे आणि शिलाबाई पवार

"दिल्लीत त्या मनुवादी लोकानं 2018 मधी आपलं संविधान जाळलं व्हतं. तेव्हा मी एका महिलेच्या घरी धुणीभांड्याचं काम करत व्हते. तेव्हा ती महिला म्हणली की, दिल्लीत तुमची घटना जाळून टाकली. मला तिचा लई राग आला. संताप झाला माझा. मी त्यांना म्हटलं की, ताई घटना तुमचीही आहे. आपले साहेब क्लासवन अधिकारी आहेत, ते मनुस्मृतीवर चालणारे हायेत की, संविधानावर चालणारे हायेत, असं ईचारून मी तिथून घरी निघून आले."

घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कांताबाई अहिरे तळमळीनं सांगत होत्या. या त्याच कांताबाई आहेत, ज्यांनी 2018 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या आवारातील मनुच्या पुतळ्याला काळं फासलं होतं. यासाठी त्या त्यांची मैत्रीण शिलाबाई पवार यांनाही सोबत घेऊन गेल्या होत्या.

यानंतर दोघींनी 8 दिवस जयपूरच्या पोलीस कोठडीत आणि 18 दिवस तुरुंगात काढले. त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना तो संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

आरक्षणाच्या धोरणाला विरोध करत दिल्लीत एका संघटनेने राज्यघटनेची प्रत जाळली होती. आझाद सेना नावच्या एका संघटनेने हे कृत्य केल्याचा संशय होता. त्यानंतर घटना जाळतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर दोघांना अटक झाली होती. या घटनेनंतर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

मनुच्या पुतळ्याला काळं का फासावं वाटलं?

कातांबाई म्हणतात, "अनेक पुढारी म्हणत असतात की, बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळून टाकली. मात्र, जयपूरच्या उच्च न्यायालयात मनुचा पुतळा आहे असं मला समजलं. त्यामुळे तिथं जायचं ठरवलं. मी या गोष्टीवर चांगला विचार केला आणि घरात कुणाला न सांगता, कुणाशी न बोलता माझी जोडीदारीण शिलाताईला फोन केला. तिला घेऊन मी जयपूरला गेले."

धुणंभांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कांताबाई आणि वर्षातील 6 महिने कर्नाटकात जाऊन ऊसतोडी करणाऱ्या व इतरवेळी बांधकाम क्षेत्रात मजुरी करणाऱ्या शिलाबाईंसाठी जयपूरला जाण्याचाही प्रवास सोपा नव्हता.

"जाण्याआधी मला पैशांची व्यवस्था करावी लागली. मी व्याजाने 20 हजार रुपये काढले," असं कांताबाई नमूद करतात.

छत्रपती संभाजीनगर ते जयपूर या प्रवासाविषयी कातांबाई सांगतात, "आधी रेल्वे स्टेशनला जाऊन चौकशी केली. संभाजीनगरहून शनिवारी जयपुरला यायला रेल्वेगाडी होती. तेव्हा ती आठवड्यानं जायची. मग शिलाताईला घेऊन जयपुरला गेले. शनिवारी निघाल्यावर सोमवारी जयपुरला पोहचलो. 2 दिवस रेल्वे गाडीतच होतो. तिथे गेल्यावर कोर्ट कुठंय ते विचारलं आणि पाईच तिथे गेलो."

"मनु महिलाविरोधी होता. त्यामुळे त्याला काळं फासायला हवं असं वाटलं. त्या लोकांनी आपली इतकी मोठी घटना जाळली. म्हणून त्यांच्या मनुचा पुतळाच पाडण्याचा विचार होता, पण ते झालं नाही, मग काळं फासलं. काळं फासल्यावर आम्ही तिथंच थांबलो आणि 'संविधान जिंदाबाद, मनुवाद मुर्दाबाद' म्हटलो. तेव्हा सगळी पब्लिक पळत आली. वकील आले. त्या मनुवादींना आम्हाला लई हाणामारी केली," असंही कांताबाई नमूद करतात.

'देश संविधानावर चालतो, मनुस्मृतीवर नाही'

मनुच्या पुतळ्याला काळं फासल्यानंतर काय घडलं यावर बोलताना कांताबाई सांगतात, "त्यांनी पोलिसाची गाडी बोलवली आणि पोलिसाच्या गाडीत बसवून आम्हाला कोर्टात नेलं. तिथून थेट पोलीस स्टेशनमध्ये टाकलं. आम्ही म्हटलो की, आम्ही आंबेडकरवादी आहोत. पोलिसांनी आम्हाला लई मारलं. आम्ही पोलीस कोठडीत 6 दिवस होतो आणि जेलमध्ये 18-19 दिवस होतो."

"तुरुंगात आम्हाला फरशी पुसायला लावायचे, भांडे धुवायला लावायचे. झाडू मारायला लावायचे. आम्ही ते काम केलं. आम्ही जेवढे दिवस तिथं होतो तेवढ्या दिवस त्यांनी आम्हालाच हे काम करायला लावलं," असा अनुभव त्यांनी सांगितला.

Shrikant Bangale कांताबाई अहिरे

"आम्हाला तिथं ना पोलिसाचं भ्याव वाटलं, ना त्या जेलचं. तुरुंगातही आम्ही दोघी गप्पा मारतानाही हेच म्हणायचो की, बरं झालं मनुला काळं फासलं, हा पुतळा इथून काढला पाहिजे. तिथं आम्ही घरचा विचार केलाच नाही. आपण पुन्हा जयपूरला येऊ आणि हा पुतळा काढायची मागणी करू. सामान्य माणूस म्हणून कोर्टाला पत्र लिहू आणि सांगू की, तिथं महापुरुषाचा कोणताही पुतळा चालेल, हा महिलाविरोधी पुतळा आम्हाला चालणार नाही," असं त्या सांगतात.

"देश मनुस्मृतीवर चालत नाही, देश संविधानावर चालतो. हा पुतळा कशासाठी हवा?" असा थेट प्रश्न कांताबाई विचारतात.

शांताबाई जयपूरच्या तुरुंगातून बाहेर कशा आल्या?

तुरुंगात असताना कांताबाई आणि शिलाबाई यांचं वकीलपत्र घ्यायला अनेक वकील गेले. मात्र, त्यांनी अनेक दिवस कुणाच्याही वकिलपत्रावर स्वाक्षरी केली नाही.

याविषयी त्या सांगतात, "जेव्हा जयपूरचे वकील साहेब बाबुलाल बैरवा यांनी ते आंबेडकरवादी आहेत, जय भीम आहोत, असं सांगितलं. मग मला त्यांच्यावर विश्वास आला. म्हणून मी त्यांच्या वकीलपत्रावर सही केली. मग त्या वकिल साहेबांनी आमचा जामीन केला."

तुरुंगातून बाहेर आल्यावरही पैशांअभावी कांताबाई आणि शिलाबाई लगेच घरी येऊ शकल्या नाहीत.

BBC

जयपूरमधील तुरुंगातून सुटल्यावर त्या अजमेरमध्ये गेल्या. कारण जयपूरहून औरंगाबादला (आताचे छत्रपती संभाजीनगर) येणारी रेल्वे नव्हती आणि दुसऱ्या गाड्या करायला आमच्याकडे पैसेही नव्हते, जेवणाला आम्ही 'मोहताज' होतो, असं त्या सांगतात. त्यामुळे त्यांनी 8 दिवस अजमेरला थांबून झाडलोट, हॉटेलमध्ये भांडी धुणं अशी काम केली आणि मग छत्रपती संभाजीनगरला घरी आल्या. मात्र, त्यांचा संघर्ष संपलेला नव्हता.

या संघर्षाविषयी त्या सांगतात, "आम्ही जेव्हा जयपूरहून संभाजीनगरला आलो तेव्हा आमचा संसार रोडवर होता. कारण आम्ही मनुच्या पुतळ्याला काळं फासल्याचे व्हीडिओ फिरले होते, पेपरला बातम्या आल्या होत्या. त्यामुळे घरमालकानं माझ्या लेकरांसह संसार रोडवर टाकला."

"मी घरमालकाला विचारलं की, साहेब तुम्ही घर का खाली करून घेतलं. त्यावर ते म्हटले की, तुम्ही लई डेंजर बायका आहेत. त्यावर मी म्हटलं की, तुम्हाला मनुस्मृती चालते का? तुम्हाला संविधान चालत नाही का? यानंतर काही दिवस मी गायरानात राहिले. काही दिवस घर भाड्यानं घेतलं. काही दिवस नातेवाईकांकडे राहिले," असंही कांताबाई नमूद करतात.

'शिकल्या सवरलेल्या महिलांनी पुतळ्याच्याविरोधात काहीतरी केलं पाहिजे'

त्या घटनेला 7 वर्षे झालेत, मात्र आजही कांताबाईंना जयपुरमधील तो मनुचा पुतळा सतावत राहतो. त्या म्हणतात, "आम्ही अडाणी असून हे पाऊल उचललं. आता शिकल्या सवरलेल्या सगळ्या महिलांनी त्या पुतळ्याच्याविरोधात काहीतरी केलं पाहिजे. तो पुतळा तिथून काढला पाहिजे."

"संविधानाचे सगळे लाभ घेतात, मग त्या मनुस्मृतीला काय घेऊन जाळायचं. संविधान वाचवायला पुढं आलं पाहिजे. आपण संविधानामुळे जगतो, संविधानामुळे खातो हे लक्षात ठेवलं पाहिजे. शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा, हे बाबासाहेबांचे शब्द आहेत," अशी भावना त्या व्यक्त करतात.

Shrikant Bangale कांताबाई अहिरे यांचं घर

आम्ही या घटनेविषयी कांताबाईंच्या मैत्रीण शिलाबाईंशीही बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांधकाम क्षेत्रात मजुरी करणाऱ्या शिलाबाई वर्षातील 6 महिने रोजगारासाठी घर सोडून ऊसतोडीचं काम करायला कर्नाटकला जातात. त्यामुळे याविषयी बोलायलाही त्या उपलब्ध झाल्या नाहीत. मात्र, आम्ही हे काम केलं ते शिलाताईलाही आवडल्याचं कांताबाई आवर्जून नमूद करतात.

आंबेडकरांनी मनुस्मृती दहन का केलं होतं?

25 डिसेंबर 1927 रोजी तत्कालिन कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मनुस्मृतीचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ग्रंथाचे संपादक आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे उपाध्यक्ष राहिलेल्या हरी नरके यांनी 2018 मध्ये बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं, "बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 मध्ये महाड इथे मनुस्मृतीचं दहन केलं होतं. त्यांचे मित्र आणि ख्यातनाम संस्कृततज्ज्ञ गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहनाचा ठराव मांडला. त्याला बाबासाहेबांनी अनुमोदन दिलं होतं."

"मनूने चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. चातुर्वर्ण्यांचं पावित्र्य राखावं अशी शिकवण मनूने दिली होती. त्यातूनच जातीव्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं. मनूने जातीव्यवस्था निर्माण केली असं म्हणता येत नसलं, तरी त्याची बीजं मनूने पेरली आहेत," असं डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम या ग्रंथात लिहिलं आहे.

BBC

त्यांच्या 'हू वेअर द शुद्राज' आणि 'जातीप्रथेचे निर्मूलन (अनाहायलेशन ऑफ कास्ट)' या पुस्तकात देखील त्यांनी मनुस्मृतीला त्यांचा का विरोध आहे ही भूमिका स्पष्ट केली आहे.

महिला आणि दलितांचा सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारणं आणि ब्राह्मण्य वर्चस्ववादाची भूमिका यातून समाजात अनेक जातींची निर्मिती झाली. या जातींचं स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाहीत, असं ते वर्णन करत.

"चातुर्वण्य निर्माण करून मनूने श्रमाचं विभाजन नाही, तर श्रमिकांचं विभाजन केलं," असं डॉ. आंबेडकर म्हणत.

विल्यम जोन्स यांनी मनुस्मृतीचं भाषांतर इंग्रजीत केलं. इतर लोकांपर्यंत याची माहिती पोहोचली.

"पहिल्यांदा मनुस्मृतीला आव्हान महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलं. शेतमजूर, अल्पभूधारक आणि समाजातील दीन-दलितांची स्थिती पाहून त्यांनी शेठ आणि भट यांच्यावर टीका केली. मनुस्मृतीवर देखील त्यांनी टीका केली," असं राजीव लोचन यांनी बीबीसीला सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • सोशल : 'राज्यघटना जाळणं म्हणजे देशद्रोहच'
  • मनुस्मृती जाळतच राहणार, जीवे मारण्याच्या धमक्यांना घाबरत नाही - छगन भुजबळ
  • BBC Exclusive : 'भारतात लोकशाही टिकणार नाही', पाहा डॉ. आंबेडकरांची स्फोटक मुलाखत
जयपूरमध्ये उच्च न्यायालयात मनुचा पुतळा कुणी आणि कधी उभारला?

जयपूरला हायकोर्टाची इमारत होण्याआधी राजस्थान हायकोर्टाची इमारत फक्त जोधपूरला होती. राजस्थानचं क्षेत्रफळ लक्षात घेता या राज्यात आणखी एक खंडपीठ असावं, अशी मागणी होत होती.

त्या वेळी जयपूरमध्येही कोर्टाची नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राजस्थानमधील ज्येष्ठ पत्रकार नारायण बारेट यांनी सांगितलं.

राजस्थानमधील दलित चळवळीचे कार्यकर्ते पी. एल. मीठरोठ म्हणतात, "जयपूर हायकोर्टाच्या आवारातील मनूचा पुतळा 1989 मध्ये उभारला आहे. हा पुतळा स्थापन झाला तेव्हाही राजस्थानमध्ये गदारोळ उडाला होता. हायकोर्टाच्या वकिलांनी तत्कालीन बार असोसिएशनच्या अध्यक्षांकडे सुशोभिकरणासाठी परवानगी मागितली. या सुशोभिकरणाच्या नावाखाली हा पुतळा उभारण्यात आला. त्या वेळी वकिलांमध्ये उच्चवर्णीयांचं प्रमाण जास्त होतं. पहिल्यांदा कायदा लिहिणारा मनू आहे, असं सांगून हा पुतळा उभारण्यात आला."

"हायकोर्टाची एक बैठक 1989 मध्येच जोधपूर येथे झाली होती. त्यात त्यांनी हा पुतळा 48 तासांमध्ये काढावा, असा आदेश दिला होता. पण अजूनही हा पुतळा उभाच आहे. बाबा आढाव, कांशिराम अशा अनेकांनी त्याविरोधात आंदोलनं केली आहेत," असंही मीठरोठ म्हणाले.

मनु आणि मनुस्मृतीचं समर्थन करणारे कोण?

संभाजी भिडे यांनी मनू हा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांपेक्षा श्रेष्ठ होता असं म्हटलं. त्यावेळी केलेल्या भाषणात भिडे म्हणाले की, मनूने विश्वकल्याणासाठी हा ग्रंथ लिहिला होता.

मनू हा महान कायदेपंडीत होता. म्हणून त्याचा पुतळा राजस्थान हायकोर्टाबाहेर लावण्यात आल्याचं वारंवार सांगितलं जातं.

BBC

सनातन संस्था देखील मनुस्मृतीचं समर्थन करते. मनुस्मृती जाळावी की अभ्यासावी या ग्रंथाची निर्मिती सनातन संस्थेनं केली आहे. मनुस्मृतीतील मार्गदर्शनानुसार राज्यव्यवस्था अस्तित्वात होती, असा दावा सनातन संस्था करते.

नित्शे या जर्मन तत्त्ववेत्यावर मनुस्मृतीचा विलक्षण प्रभाव होता असं देखील सनातननं म्हटलं आहे. मनुस्मृतीमध्ये जातीयवादाचा उल्लेख नसल्याचं देखील सनातन म्हणतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • मनुस्मृतीत महिलांबद्दल नेमकं काय म्हटलंय, ज्यावर आक्षेप घेतला जातो?
  • 'मनुस्मृती'वरून वादंग, शिक्षण आराखड्यात नेमका काय संदर्भ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
  • संभाजी भिडेंच्या दाव्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीची स्तुती केली होती का?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.