प्रादेशिक पक्षाची नाळ ही त्या प्रदेशाच्या मातीशी जोडलेली असते. तिथल्या माणसाच्या अस्मिता, भाषा, इच्छा - आकांक्षांचे ते व्यासपीठ असते. त्यामुळेच प्रादेशिक पक्षांसाठी नव्याने ‘व्होट बॅंक’ शोधण्याची आवश्यकता नसते, ती तिथे असतेच. फक्त त्या बँकेतली पुंजी अक्कलखाती गमवायची की चक्रवाढव्याजाने लाभ करून घ्यायचा, याचे गणित ज्याला जमते तो त्या प्रदेशावर राज्य करतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना हा ‘फॉर्म्युला’ जमला होता.
‘मराठी माणूस’ हे सूत्र पकडून मराठीजनांची राजकीय मोट बांधण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्यामुळेच ‘मराठी माणसा’चे राजकारण ते करू शकले. शिवसेना ही मराठी माणसाच्या हिताच्या संरक्षणासाठी आहे, याविषयी कधी प्रश्न उपस्थित झाले नाहीत. बाळासाहेबांच्या अंगावर हिंदुत्वाची शाल असली तरी मराठी माणूस हा त्यांचा ध्यास होता. बाळासाहेबांच्या निधनानंतर आज पुन्हा बाळासाहेबांचे पुत्र उद्धव आणि पुतणे राज या दोघांनीही ‘ठाकरे’ म्हणून आम्ही मराठी माणसासाठी एकत्र येत आहोत अशी घोषणा केली.
ही ऐतिहासिक घटना आहे. या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेची तुलना ‘महाराष्ट्राच्या स्थापनादिना’सोबत करत हा मंगलमय दिन असल्याची भावना व्यक्त केली. भावनाच ती. त्यामुळे त्यातील अतिशयोक्तीकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. मुंबईत अंदाजे ३० ते ३२ टक्के मराठी मतदार आहेत. ते भाजप, शिवसेना (शिंदे) आणि काही प्रमाणात काँग्रेसकडेही जाणार आहेत. ते फक्त ठाकरे बंधूंच्या मागे राहतील अशी अपेक्षा ठेवणे अतार्किक वाटते. ‘ठाकरे’ कुटुंबासाठी हा आनंदाचा दिवस नक्कीच ठरू शकतो.
या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे मानणारी शिवसेनेची एक पिढी या महाराष्ट्रात होती, जी बाळासाहेबांनंतर या दोन्ही भावंडांवर जीव ओवाळायला तयार होती. पण ती पिढी आता राहिलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संक्रमणावस्थेतून जात आहे आणि राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागल्याच्या परिस्थितीत ही युती होते आहे. मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरू आहे, त्याविरोधात एक होण्याचे आवाहन राज यांनी केले आहे. असे कोणते षड्यंत्र राज्यात रचले जात होते? यापूर्वी या दोन्ही पक्षांनी त्याविरोधात कधी आवाज उठवला, कोणती रस्त्यावरची लढाई केली आणि किती तुरुंगाच्या वाऱ्या केल्या? या प्रश्नांची उत्तरदेखील देण्याची जबाबदारी ठाकरे बंधूंना घ्यावी लागेल.
भावनेच्या राजकारणापेक्षा वर्तमानातल्या प्रश्नांवर मुंबईकरांसोबत उभे राहण्याची आज गरज आहे, ती जागा ठाकरे बंधू नक्कीच भरुन काढू शकतात. आज मुंबईची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ते, पाणी, वीज या समस्या तर आहेतच, परंतु वाहतूककोंडी, प्रदूषण, पावसाळ्यात वारंवार तुंबणारे हे शहर खरोखर राहण्यालायक राहिलेले आहे का? मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होतो आहे, हे वास्तव आहे. गेल्या काही वर्षांपासून विकासाचे जे बिल्डरधार्जिणे प्रारूप राबवले जात आहे, त्या धोरणाचा हा परिपाक आहे.
मराठी माणूसच काय कोणत्याही, कष्टाने पैसा कमविणाऱ्या निम्न, मध्यमवर्गीय माणसाला मुंबई परवडेनाशी झाली आहे. आणि याला फक्त अमुक एक राजकीय पक्षच जबाबदार आहे, असे म्हणणे गैरलागू ठरेल. मुंबईला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी समजून सर्वपक्षीयांनी याचे लचके तोडले. अशा या मुंबईतील मूळ मराठी माणसाच्या हिताचा विचार खरोखरच मराठी नेत्यांनी केला असता तर मराठी माणसाला या शहरातून हद्दपार होण्याची वेळच आली नसती. मुंबईतील सगळे बडे बिल्डर हे अमराठी आहेत.
महापालिका निवडणुकीच्या मैदानात सत्ताधारी महायुती सर्व आयुधांनिशी मैदानात उतरणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचे स्त्रोत याबाबतीत अजिबातच मुकाबला करु शकत नाहीत. शिवसेनेने २५ वर्षे महापालिकेत सत्ता गाजवली, यातील २० वर्ष भाजप सत्तेत भागीदार होता. २०२२ पासून आतापर्यंत तीन वर्ष महापालिकेवर प्रशासकाच्या म्हणजे एकप्रकारे सत्ताधाऱ्यांच्या हातात मुंबई होती. भाजपच्या जोडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. जे मुंबईचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. आज मूळ शिवसेनेतील जवळपास १३० माजी नगरसेवक शिंदेंच्या पक्षात आहेत.
२०१७ मध्ये भाजपच्या हातून मुंबई महापालिका निसटली आहे. मात्र यावेळी त्यांनी जोरात तयारी केली आहे. या परिस्थितीत ठाकरे बंधूंची कसोटी लागेल. या निवडणुकीच्या यश अपयशानंतरदेखील ‘एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी’ हे उद्धव ठाकरेंचे विधान कायम राहते का, याची ही उत्सुकता राहील. त्यामुळे ‘फुटाल तर संपाल’ या मराठी माणसांना उद्देशून केलेल्या वक्तव्याचा ठाकरे बंधूंनी स्वत:ही धडा शिकण्याची आवश्यकता आहे.