अमेरिका आणि भारताचे संबंध कायमच चांगले राहिले. मात्र, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा झाल्यानंतर त्यांची भारताबद्दलची भूमिका बदलली. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचे सांगताना दिसतात तर दुसरीकडे भारतावर मोठा टॅरिफ लावतात. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर टॅरिफ लावत असल्याचे सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतासोबत व्यापार करार करायची आहेत. भारतीय बाजारपेठ अमेरिकन वस्तूंसाठी खुला हवा आहे. मात्र, भारतही आपल्या भूमिकेवर ठाम आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या वस्तूंमुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि मला विश्वास आहे की, लवकरच पूर्ण होईल. भारत 50 टक्के टॅरिफ कमी करण्यासाठी ठाम आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिका व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात असून भारतावरील 50 टक्के टॅरिफ कमी होऊन 15 टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो आणि याकरिता भारत आग्रही आहे.
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर त्याचा परिणाम काही क्षेत्रांवर झाला असून भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली आहे. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, लवकरच यावर करार होऊ शकतो. पण लगेचच नेमकं कधी हे सांगणे कठीण आहे. भारताने व्यापार चर्चेदरम्यान अमेरिकेला आपला अंतिम प्रस्ताव सादर केला आहे.
भारताची इच्छा आहे की, त्याच्यावर लावण्यात आलेले एकूण 50 टक्के टॅरिफ 15 टक्क्यांपर्यंत कमी केला जावा आणि रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल लावण्यात आलेला अतिरिक्त 25 टक्के दंड रद्द केला जावा. जोपर्यंत भारतावरील टॅरिफ अमेरिका कमी करणार नाही, तोपर्यंत हे व्यापार करार होणार नाहीत, हे स्पष्टच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका व्यापार करार करण्यासाठी भारतावरील टॅरिफ कमी कमी करण्याचे थेट संकेत आहेत.