नांदेड हादरलं! एकाच कुटुंबातील 4 जणांचा धक्कादायक अंत; मुलांची रेल्वेखाली उडी तर आईवडिलांनी..
Tv9 Marathi December 26, 2025 04:45 AM

ज्ञानेश्वर लोंढे, नांदेड: नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यातील जवळा गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय. तर त्यांचे आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले. त्यामुळे या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुदखेड तालुक्यातील जवळा गावात राहणाऱ्या लखे कुटुंबातील ही घटना आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे. एकाच कुटुंबातील चार जणांच्या आयुष्याचा अशा धक्कादायक पद्धतीने अंत झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या चौघांनी आत्महत्या केली की काही घातपात झालाय, याविषयी पोलिसांचा तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळतोय. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमागील कारण काय आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. बजरंग रमेश लखे (वय 22 वर्षे ) आणि उमेश रमेश लखे (वय 25 वर्षे ) या दोन सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय. तर दुसरीकडे त्यांचे वडील रमेश होनाजी लखे (वय 51 वर्षे) तर आई राधाबाई रमेश लखे (वय 44 वर्षे) हे दोघं त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मोठा मुलगा उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. तर सामाजिक कार्यातही उमेशचा सक्रिय सहभाग होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बजरंग, उमेश, रमेश आणि राधाबाई लखे या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या चौघांचे कोणाशी वाद होते का, कौटुंबिक वादातून असं टोकाचं पाऊल उचललंय का किंवा त्यांचा घातपात झालाय का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरून सुसाइड नोट सापडली का, याचीही चौकशी सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.