मुंबई - पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या मूल्यांवर आधारित कारभारच मुंबई महानगरपालिकेत रुजवला जावा, या उद्देशाने ही निवडणूक लढवली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट करत आपली भूमिका मांडली.
मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन करून ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ हे प्रत्यक्षात सिद्ध करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना साजेसे भव्य स्मारक मुंबईत लवकरच उभारले जाईल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आज भाजपच्या मुंबई येथील कार्यालयात वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अटल सुशासन संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फडणवीसांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर सडकून टीका केली.
यावेळी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवलेल्या नवभारताचा पाया खऱ्या अर्थाने अटलबिहारी वाजपेयी यांनी रचला असल्याचे अधोरेखित केले. परराष्ट्रमंत्री असताना देशाच्या परराष्ट्र धोरणाला वाजपेयींनी नवी दिशा दिली; त्याच तत्त्वांवर पुढे भारताचे परराष्ट्र धोरण घडत गेल्याचे मत त्यांनी नोंदवले.
अणुचाचणीनंतर जगाने भारतावर लादलेल्या निर्बंधांनंतरही अटलजी यांनी ठामपणे देशाची अर्थव्यवस्था सक्षमपणे उभी केली. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदी भाषेत भाषण करणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यामुळे भारतीय भाषेला जागतिक मान्यता मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.