मुंबई - राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राजधानी मुंबईमध्ये आज सर्वपक्षीयांच्या जोर बैठका आणि खलबते पाहायला मिळाली तर स्थानिक पातळीवर गल्लीमध्ये मात्र कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम अन् नाराजीनाट्य रंगले होते.
नाशिकमध्ये भाजपश्रेष्ठींना स्थानिक निष्ठावंतांच्या नाराजीचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांमध्ये ‘इनकमिंग’ वाढल्याने मूळ नेते आणि कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.
काँग्रेस पक्ष हा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत जायला तयार असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अद्याप महायुतीबाहेरच आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक ‘टिळक भवन’ या मुख्यालयात झाली.
नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणुकांमध्येसुद्धा स्थानिक नेतृत्वाकडे निर्णयाचे सर्वाधिकार देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य, माजी मंत्री खा. चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव कुणाल चौधरी, बी.एम. संदीप, माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रफुल्ल गुडधे पाटील आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे उपनेते आ. अमिन पटेल आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या बैठकीत राजधानीतील सहा विभागांचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याविषयी देखील या बैठकीत चर्चा झाली असली तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाविकास आघाडी व ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. संघटनेच्या नेत्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. अद्याप कोणत्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार करण्यात येईल.
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत स्वबळावर
‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळावरच मुंबई महापालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत पक्षाकडे आलेल्या उमेदवारांच्या अर्जावर चर्चा करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित केली जातील,’ असे मलिक यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
पुणे पॅटर्नची सर्वत्र चर्चा
राजकीय वर्तुळामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य युतीची. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या अंतिम टप्प्यात असून, त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या ‘पवार पॅटर्न’चा प्रभाव आता मुंबई, नवी मुंबई, सोलापूर आणि नाशिक यासारख्या मोठ्या शहरांमध्येही दिसून येण्याची चिन्हे आहेत.
नागपूरमध्ये महायुती एकत्रच
नागपूर : नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या चार महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. चारही शहरांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भाजप नेत्यांशी चर्चा करण्यात आली असून, चारही महानगरपालिकांमध्ये महायुती करून निवडणूक लढवण्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती शिवसेना नेते उदय सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
‘प्रत्येक जागेवर आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हे उमेदवारीच्या याद्या जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत असून, चार महानगरपालिकांपैकी दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी राहणार आहे,’ असे सावंत यांनी सांगितले.
दिवसभरात
छ. संभाजीनगरमध्ये ‘मविआ’त जागावाटपाची चर्चा
जालन्यात युतीबाबत चर्चेला वेग - रावसाहेब दानवे
कोकणात संदेश पारकर यांच्या उपमुख्यमंत्री शिंदेंशी भेटीची चर्चा
ठाण्यात मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेचे संघटक पद सोडले
नाशिकमध्ये महाविकास आघाडीची सावध भूमिका
भाजपमध्ये निष्ठावंत नेत्यांची श्रेष्ठींवर उघड नाराजी
मालेगावात भाजप-शिवसेना युतीचा निर्णय गुलदस्तात