बाथरुममध्ये असलेल्या गीजरमधून निघालेल्या गॅसमुळे श्वास गुदमरून एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. मुलगी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. हे ऐकताच कुटुंबीयांमध्ये आक्रोश सुरू झाला. सध्या कुटुंबीयांनी कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तरुणीचा अंत्यसंस्कार केला आहे.
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील ही घटना घडली. हसनपुर पोलीस ठाणे हद्दीतील राजपूत कॉलोनीत राहणारी शिवांशी चौहान (वय २२) आपल्या गावी देहरा मिलक येथील डीपीएस शाळेत शिक्षिका होत्या. नेहमीप्रमाणे शुक्रवारी त्या शाळेत जाण्याची तयारी करत होत्या. त्यावेळी खूप थंडी असल्याने त्यांनी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गॅस गीजरने पाणी गरम केले होते. काही वेळानंतर त्या आंघोळ करण्यासाठी आत गेल्या. बाथरूममध्ये व्हेंटिलेशनची कोणतीही व्यवस्था नव्हती.
श्वास गुदमरल्याने शिक्षिकेचा मृत्यू
बाथरुममध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था नसल्यामुळे आत गॅस गीजरचा गॅस भरला होता. बाथरुममध्ये श्वास गुदमरल्याने शिवांशी बेशुद्ध होऊन पडल्या. बराच वेळ बाहेर न आल्याने आईने मुलीला पाहण्यासाठी बाथरूमच्या बाहेर येऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा तोडला असता शिवांशी फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळल्या. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तरुण मुलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळा आहे.
सरकारी शिक्षिका होण्याची करत होती तयारी
कुटुंबीयांची रडून-रडून अतिशय वाईट अवस्था झाली आहे. त्यांना विश्वासच बसत नाही की त्यांची मुलगी या जगात नाही. शिवांशी खाजगी शाळेत शिक्षिका होत्या, पण त्याचबरोबर त्या सरकारी शिक्षिका होण्याचीही तयारी करत होत्या. काही काळापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. शिवांशी तीन बहिणी आणि एका भावामध्ये सर्वात मोठी होती. मोठ्या बहिणीच्या मृत्यूने धाकटे भाऊ-बहिणींचीही वाईट अवस्था झाली आहे. त्यांच्या शाळेत आणि परिसरात शोकाकुल वातावरण आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना ठाण्यात तरुणीच्या मृत्यूची कोणतीही माहिती मिळालेली नाही.